नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मोरबेत ५ महिन्यांचा पाणीसाठा; महापालिकेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 01:53 AM2021-03-23T01:53:53+5:302021-03-23T01:54:10+5:30

मोरबेत पाच महिने पुरेल इतका पाणीसाठा; पाणीकपात नाही, पाण्याचा जपून वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन

Navi Mumbaikars, use water sparingly, 5 months water storage in Morbet; Municipal appeal | नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मोरबेत ५ महिन्यांचा पाणीसाठा; महापालिकेचं आवाहन

नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मोरबेत ५ महिन्यांचा पाणीसाठा; महापालिकेचं आवाहन

Next

नवी मुंबई : जागतिक जल दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोरबे धरणात पुढील पाच महिने म्हणजेच ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही. असे असले तरी नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका स्वतःच्या मालकीच्या मोरबे धरणातून शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करते. असे असले तरी मान्सूनचा अंदाज बांधता येत नसल्याने दरवर्षी मार्च महिन्यात पाण्याचे नियोजन केले जाते. गरज पडल्यास पाणीकपातीचा पर्याय निवडला जातो. परंतु या वर्षी तशी गरज पडणार नाही. कारण मोरबे धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणी किमान पाच महिने पुरेल, असा विश्वास महापालिकेच्या संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी देशाच्या अनेक भागांत आजही पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना पाण्याचा अपव्यय टाळून आवश्यक तेव्हढेच पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मोरबेची पाणीसाठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. म्हणजेच मोरबेत एकूण १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. सध्या मोरबे धरणात ११४.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न पडल्याने धरण पूर्णत: भरले नाही. त्यामुळे या वर्षी पाणीकपातीची शक्यता वर्तविली जात होती. मात्र धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्तास पाणीकपातीची कोणतीही शक्यता नसल्याचे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Web Title: Navi Mumbaikars, use water sparingly, 5 months water storage in Morbet; Municipal appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.