नवी मुंबईचा दहावीचा निकाल ९७.४५ टक्के, यंदाही मुलीच अव्वल; शाळांनी राखली यशाची परंपरा
By योगेश पिंगळे | Published: May 27, 2024 05:04 PM2024-05-27T17:04:42+5:302024-05-27T17:05:29+5:30
यंदा ९६.७८ टक्के मुले, तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी २७ मे रोजी जाहीर झाला. नवी मुंबई शहराचा निकाल ९७.४५ टक्के इतका लागला आहे. यात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलीच अव्वल ठरल्या आहेत. शहरातील अनेक शाळांनी आपली यशाची परंपरा निकालातून यंदाही कायम राखली आहे. यंदा ९६.७८ टक्के मुले, तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
राज्यभरात १ मार्च ते २६ मार्च २०२४ यादरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेला शहरातील १४३ शाळांच्या माध्यमातून १५ हजार ६३६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामधील १५ हजार २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा शहरातील तब्बल ५७ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. काही दिवसांपूर्वीच बारावीचे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना दहावीच्या निकालाची उत्सुकता लागली होती. सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यावर निकालाच्या सर्व वेबसाइट काही वेळ संथगतीने सुरू होत्या. निकाल कळल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांसोबत आनंद व्यक्त केला.
पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६० टक्के....
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला शहरातून ९१० पुन:परीक्षार्थी विद्यार्थी सामोरे गेले होते. यामधील ५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६०.८७ टक्के इतका लागला आहे.
समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव....
दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विविध व्हॉट्सॲप ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अनेकांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निकटवर्तीयांचे फोटो, निकालाची प्रत व्हॉट्सॲपच्या स्टेट्सला ठेवले होते.
दरवर्षी साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लावला जातो. यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच निकाल लावणे हे या निकालाचे वैशिष्ट्य असून, याकामी सर्वांचे सहकार्य मिळाले आहे. मुंबई विभागाचा निकाल चांगला लागला असून अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. पुन्हा जोमाने चांगला अभ्यास करून जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे, असं
डॉ. सुभाष बोरसे, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणाले.