नवी मुंबईची ३० वर्षांची पाणीचिंता मिटणार, नवीन जलस्रोतांसाठी भरीव तरतूद

By कमलाकर कांबळे | Published: February 20, 2024 08:04 PM2024-02-20T20:04:14+5:302024-02-20T20:04:25+5:30

तीन नव्या जलस्रोतांची केली चाचपणी

Navi Mumbai's 30-year water worries will end | नवी मुंबईची ३० वर्षांची पाणीचिंता मिटणार, नवीन जलस्रोतांसाठी भरीव तरतूद

नवी मुंबईची ३० वर्षांची पाणीचिंता मिटणार, नवीन जलस्रोतांसाठी भरीव तरतूद

नवी मुंबई : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची गरजही भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर २०५५ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येचा विचार करून महापालिकेने पाण्यासाठी पुढील तीस वर्षांचे नियोजन केले आहे. त्यानुसार २०२४-२५ च्या मूळ अर्थसंकल्पात नवीन जलस्रोतांचा शोध, महापालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठ्यातील वितरण व्यवस्थेत सुधारणांसाठी या अर्थसंकल्पात २०१ कोटी १७ लाखांची भरीव तरतूद आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केली आहे.

महापालिका स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणातून शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु दिवसेंदिवस शहराची वाढणारी लोकसंख्या, पाणीपुरवठ्यातील गळती आदींमुळे सध्याच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण पडत आहे. मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी समस्या भेडसावू लागली आहे. सध्या मोरबे धरणातून शहराला दैनंदिन ४५० द.ल.लि. पाणीपुरवठा केला जातो. पुढील तीस वर्षांत म्हणजे सन २०५५ पर्यंत शहराची संभाव्य लोकसंख्या पाहता दैनंदिन ९५० द.ल.लि. पाण्याची गरज भासणार आहे. एकूणच अतिरिक्त ५०० द.ल.लि. पाण्याचे आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेने नियोजन सुरू केले आहे.

*तीन नव्या जलस्रोतांची केली चाचपणी
नवीन जलस्रोतांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. याअंतर्गत भीरा जलविद्युत प्रकल्पातून विसर्ग होणारे पाणी नवी मुंबईकडे वळविण्याची योजना आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात पाताळगंगा नदीतील पाणी उचलणे, भीरा धरणातून कुंडलिका नदीचे पाणी वळविणे या नवीन जलस्रोतांचीसुद्धा महापालिकेकडून चाचपणी केली जात आहे. त्यासाठी चालू अर्थसंकल्पात २०१ कोटी १७ लाख रुपयांची भरीव तरतूद केली आहे.

*पाणी वितरणात सुधारणा करण्यासाठी विशेष भर

पाणीपुरवठ्यातील वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विशेष प्रयास केले जात आहेत. १५ व्या वित्त आयोगामार्फत त्यासाठी आतापर्यंत २७६.८३ कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. यात भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची सुधारणा, भोकरपाडा ते पारसिक हिलपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीचे बळकटीकरण करणे तसेच बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा विभागात नवीन जलकुंभ बांधणे, जलवितरण व्यवस्थेत सुधारणा करणे पम्पिंग मशीन बदलणे या कामांचा समावेश आहे.

Web Title: Navi Mumbai's 30-year water worries will end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.