नवी मुंबई : ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर तालुक्यांमध्ये नवी मुंबईचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. यामुळे नवी मुंबईतील रहिवाशांकडून केल्या जाणा-या अर्जाची पूर्तता करण्यात अडथळा येत आहे. परिणामी नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रांकडे धाव घ्यावी लागत असून, अतिरिक्त पैसे देखील मोजावे लागत आहेत.नागरिकांना घरबसल्या सुविधांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. मागील दोन वर्षात या संकेतस्थळाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, परंतु या संकेतस्थळाचा वापरकर्त्यांपैकी नवी मुंबईकरांची मात्र घोर निराशा होत आहे. आपले सरकारच्या माध्यमातून राज्यातील शासनाच्या ३९ विभागातील ३९९ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांच्या माध्यमातून नागरिक घरबसल्या जन्मदाखला, सातबारा, उत्पन्नाचा दाखला याशिवाय शेतीविषयक अथवा विविध परवाने प्राप्त करून घेवू शकत आहे. त्याकरिता वेबसाइटवर स्वत:ची नोंदणी केल्यानंतर आॅनलाइन अर्ज भरला जातो. मात्र हा अर्ज भरतेवेळी ज्यांचे वास्तव्य नवी मुंबईत आहे, त्यांना नवी मुंबईतील एखाद्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यापुढे अडथळा निर्माण झालेला आहे. जिल्ह्याची निवड केल्यानंतर तालुका निवडताना त्यात नवी मुंबईचा उल्लेखच केलेला नाही. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांचा उल्लेख आहे. केवळ नवी मुंबईचा उल्लेख नसल्याने त्या क्षेत्रातील वास्तव्याचे ठिकाण निवडण्यात अडचणी येत आहेत. तालुक्याचाच उल्लेख नसल्याने त्यापुढच्या रकान्यात गावाचा (ग्रामपंचायत) उल्लेख होवू शकत नाही.अर्जाच्या सुरवातीलाच अडथळा निर्माण होवून अर्जदारांची घोर निराशा होत आहे. जन्मदाखला, विवाह नोंदणी, रहिवासी दाखला यासह इतर अनेक दाखल्यांच्या बाबतीत ही समस्या समोर आली आहे. ‘आपले सरकार’ संकेतस्थळ सुरू झाल्यापासून ही परिस्थिती कायम आहे.
‘आपले सरकार’वर नवी मुंबईकरांची निराशा; आॅनलाइन अर्ज भरण्यात अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 2:29 AM