नवी मुंबई : शहरातील पारा ४१ अंशावर पोहोचला असून तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात या आठवड्यात तापमान सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी किमान २५, तर किमान ४१ अंश तापमान होते. उकाड्यामुळे दिवसा रोडवरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये काम करणारे माथाडी कामगार, मार्केटिंगचे व इतर फिरून काम करणाऱ्यांना त्रास खूपच होत आहे.
उकाड्यामुळे दिवसा घराबाहेर पडणाऱ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे दिवसा घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्पचा वापर करावा. खरेदीसाठी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी बाहेर पडावे. दुपारी काम नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. उन्हाळ्यामुळे उष्माघातासह त्वचा रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कलिंगड, खरबूजला मागणी वाढलीकडक उन्हाळ्यामुळे मुंबई बाजार समितीमध्ये शुक्रवारी तब्बल ५८९ टन कलिंगड, २२९ टन खरबूज, ६१ टन मोसंबी व २४ टन संत्रीची विक्री झाली आहे. याशिवाय उसाच्या रसालाही मागणी वाढली आहे.