नवी मुंबई : वाशी खाडी पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आता वाहन चालकांची लवकरच सुटका होणार आहे. वाशी खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी एक पूल मे महिन्यापर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यातून मुंबईहून वाशीकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सायन-पनवेल मार्गावर मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. हा नवीन पूल १९९४ मध्ये वाहतुकीला सुरू करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावरील वाहतूक गेल्या काही वर्षांत वाढली. त्यामुळे हा पूल अपुरा पडत आहे. परिणामी वाशी टोल नाका भागात वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या पुलावर होणारी कोंडी सोडविण्यासाठी सध्या वाहतुकीसाठी सुरू असलेल्या ठाणे खाडी पुलाच्या दोन्ही बाजूंना समांतर असे प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी दोन पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत आहेत.
यातील मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे केवळ एका स्पॅनच्या काही सेगमेंट उभारणीचे काम शिल्लक आहे. हे काम येत्या दीड ते दोन महिन्यात पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. वाशीकडून मानखुर्दच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाची सद्यस्थितीत जवळपास ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करून ही मार्गिका डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी सुरू केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, या मार्गामुळे मुंबई ते वाशी हा प्रवास जलदगतीने होणार आहे.
‘वाशी खाडी पुलाची मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करून मार्गिका मे महिन्यात वाहतुकीसाठी खुली केली जाईल,’ अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
प्रकल्पाची माहिती -
१) ५५९ कोटी प्रकल्पासाठी खर्च
२) ३८० मीटर मुंबईकडे पोहोचमार्ग
३) १८३७ मीटर पुलांची लांबी
४) ३/3 पूल - प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन पूल
५) ९३० मीटर नवी मुंबईकडील पोहोचमार्ग
६) १० पथकर नाके दोन्ही बाजूच्या प्रत्येकी वाहतुकीसाठी