नवी मुंबई : कोरोनाच्या सावटामुळे नवी मुंबई शहरातील निम्म्याहून अधिक मंडळांनी यंदाचा नवरात्रौत्सव रद्द केला आहे. ज्यांना नवरात्री साजरी करायची असेल, त्यांना केवळ देवीची मूर्ती स्थापनेला परवानगी आहे. त्यामुळे नवरात्र काळात नऊ रंगाची उधळण करत टिपरीवर पडणारी टिपरी यंदा हाती लागणार नसल्याची खंत गरबाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
शासनाने नवरात्रौत्सव आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्याची पुरेपूर अंमलबजावणी करण्याची भूमिका महापालिका व पोलीस प्रशासन करत आहे. गरबा खेळण्यावर मनाई केल्याने मंडळांना तशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. परिमाणी, शहरातील निम्म्याहून अधिक नवरात्रौत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव रद्द केला आहे, तर ५६ मंडळांकडून केवळ देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाणार असून, त्यांना पालिका व पोलिसांकडून तशी परवानगी मिळवली आहे.
गेल्यावर्षी १४८ मंडळांकडून नवरात्रौत्सव साजरा करण्यात आला होता. त्यापैकी ९० मंडळांनी यंदाचा उत्सव रद्द केला आहे. त्यात घणसोली नोडमधील सातही मंडळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा घणसोली नोडमध्ये एकही सार्वजनिक देवीची स्थापना होणार नाही. नवी मुंबई शहरात असेच चित्र पहावयास मिळणार आहे.
नवरात्रौत्सवादरम्यान गर्दी टाळण्यासाठी शासनाने गरबा खेळण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मंडळांना केवळ देवीची स्थापना करायची अनुमती पालिका व पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी भाविकांची गर्दी होणार नाही, यासह आवश्यक सूचना मंडळांना केल्या. - सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली?
भक्तांची गर्दी होऊ नये, याकरिता बहुतांश मंडळे उघड्या मंडपात देवीची स्थापना करणार आहेत. ओटी भरणे, पूजा यासाठी भक्तांना मनाई केली आहे. तर ठरावीक अंतरावरूनच देवीचे दर्शन घेऊ दिले जाणार आहे. ज्या मंडळांना देवी स्थापनेची परवानगी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व सुरक्षेच्या दृष्टीने इतर उपाययोजनांचे पालन होत आहे का, यावर पोलीस व पालिकेचे लक्ष राहणार आहे.