प्रशिक्षणार्थी तरुणांना समजले नक्षलवादी!
By admin | Published: February 2, 2016 02:06 AM2016-02-02T02:06:52+5:302016-02-02T02:06:52+5:30
पुण्यावरून मुंबईला जात असलेल्या मालगाडीच्या चालकाला लोणावळा-कर्जत दरम्यान नाथबाबा या ठिकाणाजवळ रेल्वे पुलावर काही संशयित तरुण सैनिकांच्या वेशात रविवारी रात्री दिसल्याने
खालापूर : पुण्यावरून मुंबईला जात असलेल्या मालगाडीच्या चालकाला लोणावळा-कर्जत दरम्यान नाथबाबा या ठिकाणाजवळ रेल्वे पुलावर काही संशयित तरुण सैनिकांच्या वेशात रविवारी रात्री दिसल्याने या तरुणांच्या शोधासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणाच कामाला लागली होती. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मालगाडी चालकाच्या माहितीनुसार हे तरुण नक्षलवादी असावेत असा प्राथमिक अंदाज बांधून रायगड व पुणे पोलिसांनी जंगलात संयुक्त मोहीम राबवून या तरुणांचा शोध घेत होते. अखेर हे तरुण प्रशिक्षणासाठी खोपोलीत आल्याचे आणि रात्री ट्रेकिंगसाठी गेल्याचे उघड झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेने पोलीस यंत्रणेला कामाला लावले होते.
पुणे येथून निघालेली मालगाडी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लोणावळा व कर्जत स्थानकाच्या दरम्यान असलेल्या नाथबाबा येथील रेल्वे पुलाजवळ आल्यानंतर मालगाडीच्या चालकाला सैनिकी वेशातील काही तरुण हातात बॅटरी घेवून उभे असल्याचे दिसले. हे तरुण रेल्वे पोलीस दलातील जवान किंवा सैनिक असावेत असे वाटल्याने मालगाडीच्या चालकाने गाडीचा वेग कमी केला. त्याच वेळेस अंधारातून आणखी २० ते २५ तरुण रेल्वे रुळावर आले. या तरुणांच्या पाठीवर बॅगा होत्या त्यामुळे मालगाडीच्या चालकाला हे तरुण नक्षलवादी तर नाहीत ना? असे वाटले. घाबरलेल्या मालगाडी चालकाने याची माहिती कर्जत व लोणावळा रेल्वे पोलिसांना दिली. इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण जंगलात असलेल्या रेल्वे रुळावर दिसल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणाच कामाला लागली. खोपोली, कर्जत, खालापूर, नेरळ, लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलिसांबरोबरच रेल्वे पोलीसही या संशयित तरुणांच्या शोधासाठी बाहेर पडले. अंधारात जंगलामध्ये हत्यारे घेऊन पोलिसांची शोध मोहीम सुरू होती. रायगड व पुणे गुन्हे अन्वेषण विभागही शोध मोहिमेत गुंतला होता.
खोपोलीचे पोलीस निरीक्षक एस.एम. शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खोपोलीतून जंगल भागात तपास सुरू केला. त्यावेळी झेनिथ कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या दत्तमंदिराजवळ तंबू टाकले असून सैनिकी वेशातील तरुण शिंदे यांना आढळून आले. अधिक तपास केल्यानंतर रिलायन्स कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग या ठिकाणी सुरू असून रात्री हेच तरुण रेल्वे रुळावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले. खोपोलीतील यशवंती हायकर्सच्या वतीने तरुणांना अशा प्रकारचे प्रशिक्षण दरवर्षी दिले जाते. या प्रशिक्षणाची कुठलीच कल्पना पोलिसांना नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. हे सारे उघड झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आम्ही विविध कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणांना अशा प्रकारचे प्रशिक्षण गेली २५ वर्षांपासून देत आहोत. यासाठी वनविभागाची जागा वापरत असल्याने त्यांची व श्री दत्त मंदिर देवस्थानची परवानगी घेतो. इतक्या वर्षात पोलिसांची परवानगी घेण्याचा प्रश्नच आला नाही. आमच्यामुळे पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
- राजाबापू सगळिगळे, समन्वयक, यशवंती हायकर्स खोपोली