नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील ईडीच्या (सक्तवसुली संचालनालयाने) कारवाईविरोधात पवार समर्थनार्थ राज्यातील विविध भागातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून त्यांना रोखण्यात येत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या नवी मुंबईतील जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई गाठण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी रेल्वेचा मार्ग अवलंबला.राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या बँकेच्या कोणत्याही पदावर नसताना गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गुन्हा दाखल केल्यामुळे शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी पवार ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार होते. या वेळी पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्याच्या विविध भागातून मुंबईत दाखल होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या विनंतीनुसार पवार यांनी ईडी कार्यालयात जाणे टाळले.नवी मुंबई राष्ट्रवादीच्या माध्यमातून मुंबई येथे जाण्यासाठी नेरुळहून बसची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी कार्यकर्ते जमा होण्यास सुरु वात झाल्यावर नेरु ळ पोलिसांनी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह इतर पदाधिकाºयांना ताब्यात घेतले. गावडे यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी जमा होणाºया कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले जात होते. त्यामुळे कार्यालयाकडे न येता कार्यकर्त्यांनी रेल्वेने प्रवास करीत मुंबई गाठली. पोलीस मुंबईकडे जाण्यास मज्जाव करीत असल्याने नगरसेविका सपना गावडे देखील महिला कार्यकर्त्यांसह बुरखा घालून रेल्वेने मुंबईकडे रवाना झाल्या.शशिकांत शिंदेंनी रेल्वेने गाठली मुंबईराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समर्थनार्थ मुंबईच्या दिशेने निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलीस जाण्यास मज्जाव करीत असल्याने पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वेने मुंबई गाठली. आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील रेल्वेने प्रवास करून मुंबई गाठली.वाशी टोल नाक्यावर वाहने अडवलीपवार यांच्या समर्थनार्थ पुणे, सातारा आदी भागातून मुंबईत येणारी सुमारे २0 वाहने पोलिसांनी वाशी टोल नाक्यावर अडवली. त्यानंतर वाहनांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाशी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांच्या या कारवायांमुळे अनेक कार्यकर्ते मुंबईला पोहचू शकले नाहीत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:07 PM