राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:00 AM2018-12-05T01:00:21+5:302018-12-05T01:00:30+5:30
रिक्षाचालकाचे अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे;
नवी मुंबई : रिक्षाचालकाचे अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु पूर्ववैमनस्यातून आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप नगरसेवकाने केला आहे. दरम्यान, या प्रकारातून दोन गटांत वाद होण्याची शक्यता असल्याने खैरणे परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
राष्टÑवादीचे नगरसेवक तथा क्रीडा समिती सभापती मुनावर पटेल यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात साहिदा शेख यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांचा मुलगा सुफियान शेख याला नगरसेवक मुनावर पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरण करून मारहाण केल्याची त्यांची तक्रार आहे. बोनकोडे येथील रिक्षाथांब्यावर रिक्षा घेऊन सुफियान थांबलेला असताना, त्या ठिकाणी आलेल्या तरुणांनी त्याला जबरदस्ती पटेल यांच्या कार्यालयात नेले. त्या ठिकाणी मुनावर पटेल व त्यांच्या सहकाºयांनी त्याला मारहाण केली; परंतु या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने त्यांनी गतमहिन्यात पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. त्या आधारे तपासांती मुनावर पटेल यांच्यासह त्यांच्या आठ सहकाºयांवर अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोधकांनी शेख कुटुंबाला हाताशी धरून पूर्ववैमनस्यातून आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवले गेल्याचा आरोप मुनावर पटेल यांनी केला आहे. गतमहिन्यात प्रभागातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली होती. तसेच रिक्षा थांब्यांवर बसणाºया व्यसनी तरुणांनाही वेळोवेळी हटकत असतो, यामुळे वैयक्तिक भावना दुखावल्या गेलेल्या व्यक्तींनी शेख कुटुंबाला हाताशी धरून आपल्याविरोधात षड्यंत्र रचून खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचे मुनावर पटेल यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकारातून दोन गट समोरासमोर येऊन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सोमवारी रात्रीपासून खैरणे परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.