नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकमेव महापालिका सुद्धा हातातून गेली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सावरण्यासाठी पक्ष नेतृत्वाची धडपड सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नेरूळ येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.या मेळाव्याच्या आयोजनात राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. त्याचप्रमाणे गर्दी वाढविण्यासाठी माथाडी नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याचा परिणाम म्हणून या मेळाव्याला अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचे पाहावयास मिळाले. शरद पवार यांनी आपल्या भाषणातून नाईक यांच्यावर बोचरी टीका केली. विकासकामाचे कारण पुढे करून पक्षांतर करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट करीत २0१४ मध्ये मंदा म्हात्रे यांच्याकडून नाईक यांचा झालेला पराभव हा त्यांच्याच चुकीचा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता पक्ष बदलून त्यांनी पुन्हा मोठी चूक केली असून जनता त्यांना माफ करणार नाहीत, हे सांगायला सुद्धा ते विसरले नाहीत. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांत एक वेगळाच उत्साह पाहावयास मिळाला.खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या खास शैलीत केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. आता गणेशोत्सव संपल्याने विसर्जनावर बोलण्यात काही अर्थ नाही, अशा शब्दात त्यांनी नाईक यांच्या पक्षांतराच्या मुद्याला बगल दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्या भाषणांनी उपस्थित कार्यकर्त्यांत उत्साह दिसून आला. एकूणच येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीला नव्या जोमाने सामोरे जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
राष्ट्रवादीचे नवी मुंबईत शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:37 PM