राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:38 AM2019-04-04T01:38:45+5:302019-04-04T01:39:04+5:30
आघाडीची बैठक : सुरेश टावरे यांच्या पदाधिकारी भेटीवरून घातला गोंधळ
बदलापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश टावरे यांनी बदलापुरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी दौरा केला. बदलापूर ब्लॉक कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीनंतर टावरे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणार होते; मात्र राष्ट्रवादीच्या दोन गटांनी येथे गोंधळ घातला. टावरे यांनी पहिले माझ्याकडे यावे, असा हट्ट केल्याने टावरेंची कोंडी झाली. दोन्ही पदाधिकाऱ्यांना नाराज न करता ते आधी शहराध्यक्षांकडे गेले आणि नंतर दुसºया गटाच्या पदाधिकाºयांची भेट घेतली.
काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइंच्या विविध गटांतील पदाधिकाºयांची भेट घेण्यासाठी टावरे हे बदलापुरात आले होते. ब्लॉक कार्यालयात कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर ते शहरातील इतर पदाधिकाºयांची भेट घेण्यासाठी जाणार होते; मात्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख आणि राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे अविनाश देशमुख या दोघांनीही पहिले माझ्यासोबत चला, असा हट्ट टावरे यांना केला. नेमके कोणाबरोबर आधी जायचे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कालिदास देशमुख यांच्यासोबत त्यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जायचे की, अविनाश देशमुख यांनी रिपाइंच्या एका पदाधिकाºयासोेबत ठेवलेल्या बैठकीला जायचे, याबाबत निर्णय घेताना टावरे यांनादेखील अडचण निर्माण झाली.
ठरलेल्या कार्यक्रमानुसार आधी कालिदास देशमुख यांच्याकडे जाण्याचा आणि त्यानंतर लागलीच अविनाश देशमुख यांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. टावरे यांच्या या निर्णयानंतर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरूच होती. अखेर, टावरे यांनीच सर्व कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे ब्लॉक कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला नव्या, जुन्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.