"कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे की..."; अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 09:11 AM2023-12-17T09:11:53+5:302023-12-17T09:12:55+5:30

पक्ष फोडून  चाणक्य होता येत  नाही तर स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा करणारेच खरे चाणक्य आहेत, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

ncp mp Amol Kolhe targets Ajit Pawar group in navi mumbai rally | "कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे की..."; अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर निशाणा

"कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे की..."; अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर निशाणा

नवी मुंबई :नवी मुंबईतील कळंबोली येथे काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शरद पवार यांनी काय केलं, असा प्रश्न काही जणांकडून विचारला जातो. मात्र असा प्रश्न विचारणाऱ्याच्या कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे, पवारसाहेबांनी काय नाही केलं? ईडी , सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो," अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचा समाचार घेतला.

अजित पवार गटावर निशाणा साधताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, "आपल्यातून गेलेले नेते दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे आहेत. वतनदारी वाचवण्यासाठी त्या वेळेस अनेक जण दिल्ली दरबारी मुजरा घालत होते. महाराजांनी मात्र स्वराज्याचा स्वाभिमान निवडला. दिल्लीश्वरांना प्रश्न विचारायचा स्वाभिमान यांच्यात राहिला नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारायचं बंद होतं, तेव्हा अंधभक्त तयार होतात. पक्ष फोडून  चाणक्य होता येत  नाही तर स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा करणारेच खरे चाणक्य आहेत," असा टोलाही कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला.

वळसे पाटलांवरही टीकास्त्र

शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जाणारे नेते दिलीप वळसे पाटील हेदेखील अजित पवार गटात दाखल झाले आहेत. नवी मुंबईतील सभेत बोलताना अमोल कोल्हे यांनी वळसे पाटलांनाही टोला लगावला आहे. "जुन्नर आंबेगावचे लोक फक्त पुजाऱ्यालाच नमस्कार करायचे. आता याच पुजाऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवायला जनता तयार झाली आहे," असं ते म्हणाले. 

जयंत पाटीलही बरसले!

भाजपवर पलटवार करताना जयंत पाटील म्हणाले की, "पवार साहेबांनी कायम माणसं जमा केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले २५ वर्ष सर्वत्र कसा पोहोचेल याकडे लक्ष दिले. आज आमच्यातून काही लोक आम्हाला सोडून गेलेले आहेत, परंतु आज पवार साहेबांच्या मागे सर्वसामान्य कार्यकर्ता छातीचा कोट करून साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. पवार साहेबांची पुण्याई हे आपल्या सर्वांच्या कामाचे भांडवल आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे, पवार साहेबांवर टीका करणे; आजही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाची बांधणी जोडणीबाबत सूत्र सांगण्याऐवजी पवार साहेबांवर निम्मा वेळ खर्च करून पवार साहेबांवर टीका करण्यात धन्यता मानली. का ? तर, त्यांना पवार साहेबांची भीती वाटते. पवार साहेबच भारतात फिरणारा अश्वमेध महाराष्ट्रात अडवू शकतात हे सर्वांना माहीत आहे, म्हणून त्यांनी साहेबांवर टीका केली. सध्या महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या स्थितीने चालू आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आरक्षणाविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही," अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

 

Web Title: ncp mp Amol Kolhe targets Ajit Pawar group in navi mumbai rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.