राष्ट्रवादीने केला सरकारचा निषेध; निदर्शने करून ईडीविरोधात घोषणा
By नारायण जाधव | Published: February 1, 2024 06:38 PM2024-02-01T18:38:18+5:302024-02-01T18:38:39+5:30
आंदोलनानंतर कोकण आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
नवी मुंबई: राष्ट्रवादीचे जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून बारामती ॲग्रो आणि कन्नड साखर कारखाना प्रकरणी केल्या जाणाऱ्या कारवाईविरोधात नवी मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी सिडको ऑफिसच्या बाजूचा चौक, सीबीडी बेलापूर येथे निषेध आंदोलन केले. पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला काँग्रेसच्या सलुजा सुतार यांच्या नेतृत्वाखाली याप्रसंगी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून ईडीचा निषेध नोंदविला.
आंदोलनानंतर कोकण आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या हिताचे मुद्दे घेऊन लढत असून सामान्य लोकांच्या प्रश्नावरही कायम आवाज उठवित राहणार आहे. अशा आंदोलनाद्वारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते झोपेचे सोंग घेणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सदैव लढा उभारणार असल्याचे पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून केंद्र व राज्य सरकारच्या दमणशाहीला भीक घालणार नसल्याचे पाटील म्हणाले. पक्षाच्या ध्येयधोरणानुसारच गुरुवारी राष्ट्रवादीने राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, माजी नगरसेवक संदीप सुतार व कार्यकर्ते उपस्थित होते.