राष्ट्रवादीची गुरूवारी सरकारविरोधात निदर्शने; ईडीचा करणार निषेध
By नारायण जाधव | Published: January 31, 2024 07:19 PM2024-01-31T19:19:18+5:302024-01-31T19:19:35+5:30
झोपेचे सोंग घेणाऱ्या या सरकारला जागे करणार असल्याचे पक्षाचे नवी मुंबंई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई : आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईविरोधात नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत सिडको ऑफिसच्या बाजूचा चौक, सीबीडी बेलापूर येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनानंतर कोकण आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या हिताचे मुद्दे घेऊन लढत असून गुरुवारीही आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नावरही आवाज उठवून झोपेचे सोंग घेणाऱ्या या सरकारला जागे करणार असल्याचे पक्षाचे नवी मुंबंई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून केंद्र व राज्य सरकारच्या दमनशाहीला भीक घालणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यासाठीच सरकारचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.