मधुकर ठाकूर
उरण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांच्या कारभाराला कंटाळून चिरनेर येथील महिला- पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांच्या हाताला शिवबंधन बांधून व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शिवसेना पक्षातर्फे या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
चिरनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण तालुका युवक संघटनेचे उपाध्यक्ष निलेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे उरण तालुका उपाध्यक्ष मिलिंद ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिरनेर गाव अध्यक्ष अमर ठाकूर यांच्यासह ठाकूर परिवारातील अनेक महिला पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या महिला पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले .परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची मोठी निराशा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी या कार्यकर्त्यांना कधी विश्वासात घेतलेच नाही. गलथान व मनमानी कारभाराला कंटाळून अमर ठाकूर, निलेश ठाकूर, मिलिंद ठाकूर यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल, शेकापचे सुरेश पाटील, काँग्रेसचे अलंकार परदेशी चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किरण कुंभार, इंटकचे राजेंद्र भगत यांच्या प्रमुख उपस्थितीसह महाआघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविवारी २९ ऑक्टोबर रोजी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे .
यावेळी महाआघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सेनेतील प्रवेशामुळे महाआघाडीसाठी निवडणूक आणखी सोपी झाली आहे.