नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर तिला अटक करण्यात आली. कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांनी केतकीचा ताबा घेतला. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाई फेकली आणि अंड्यांचादेखील मारा केला.
शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेविरोधात ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. आज दुपारी नवी मुंबई पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला कळंबोली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर तिला ठाणे पोलिसांनी तिचा ताबा घेतला. कळंबोली पोलीस ठाण्यातून तिला नेलं जात असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर अंडी आणि काळी शाई फेकली.
केतकी चितळेवर शरद पवार म्हणतात...केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीनं तुमच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिली आहे, असं शरद पवारांना पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. केतकी चितळेला ताब्यात घेण्यात आल्याची माहितीदेखील पवारांना देण्यात आली. त्यावेळी अशा नावाच्या कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही, असं पवारांनी सांगितलं.
केतकी चितळे नावाची व्यक्ती माहीत नाही आणि तिनं काय केलं आहे याचीदेखील मला कल्पना नाही. तिनं काय केलं हेच माहीत नसताना त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं शरद पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी एका सभेत कवी जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा संदर्भ दिला. त्याबद्दल वेगळं चित्र काहींकडून मांडलं गेल्याचं पवारांनी सांगितलं.