काँग्रेसच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:02 AM2017-10-29T01:02:33+5:302017-10-29T01:02:50+5:30
महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँगे्रसच्या नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती
नवी मुंबई : महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँगे्रसच्या नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. निरीक्षक भाई जगताप यांच्यासमोर दहाही नगरसेवकांनी विकासकामे होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँगे्रसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसची मते निर्णायक ठरणार असल्यामुळे महापौर पद टिकविण्यासाठी त्यांची मनधरणी करताना सत्ताधाºयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. शिवसेनेने पालिकेवर भगवा फडकवण्याची घोषणा केली असल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गोटामध्येही अस्वस्थता पसरली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत: निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. २०१६मध्ये स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये काँगे्रसचे एक मत फोडून शिवसेनेने स्थायी समितीचे सभापतिपद मिळविले होते. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. पक्षातील नाराजांची समजूत घालतानाच काँगे्रसचा पाठिंबा मिळवितानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. काँगे्रसने भाई जगताप यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. जगताप यांनी नुकतीच काँगे्रसभवनमध्ये सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. अडीच वर्षांमध्ये प्रभागामध्ये विकासाची कामे झाली का? अशी विचारणा त्यांनी सर्वांना केली. या वेळी सर्व दहाच्या दहा नगरसेवकांनी अपेक्षित गतीने विकासाची कामे झाली नसल्याने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. पहिले एक वर्ष निधी नसल्याचे कारण देण्यात आले. दुसरे वर्ष तुकाराम मुंढे यांच्यामुळे कामे झाली नाहीत व सद्यस्थितीमध्ये आयुक्त घटनास्थळांना भेटी दिल्याशिवाय काहीच करत नसल्याने विकासाची कामे रखडली असल्याचे सांगण्यात आले. सत्ताधारी असूनही कामे झाली नसल्याची उघड खंत या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
भाई जगताप यांनी नगरसेवकांचे म्हणने ऐकून घेतले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी व पक्षश्रेष्ठींनी काँगे्रसच्या प्रदेश अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता; परंतु अद्याप त्यांची चर्चा झालेली नाही. काँगे्रसची मते निर्णायक असल्याने जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँगे्रसची नाराजी दूर करण्याचे व त्यांची मते पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीला कसरत करावी लागणार आहे. काँगे्रसने मते दिली तरच राष्ट्रवादीचा महापौर होणार आहे. शिवसेनेनेही काँगे्रसची मते फोडण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. खासदार राजन विचारे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे अडीच वर्षांमध्ये काँगे्रस नगरसेवकांशी चांगले संबंध असून त्या बळावर राष्ट्रवादीला धडा शिकविण्याचा संकल्प केला आहे. नक्की कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.