राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे पक्षाला रामराम ठोकणार, आव्हाडांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:28 AM2022-09-07T00:28:25+5:302022-09-07T00:28:34+5:30
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली.
ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे. एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. दरम्यान, अशातच राष्ट्रवादी काँग्रेसला आता आणखी एक फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, आता अशोक गावडे यांच्या जागी नामदेव भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पत्रक काढून यासंदर्भाती घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच बैठकीदरम्यान गावडे हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा समोर आली होती.
काय म्हणाले आव्हाड?
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही पक्ष सोडणार अशा बातम्या समोर येत आहेत. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. यावर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी बोलून सांगतो असं म्हटलं. पक्ष कार्यकर्त्यांशी बोलणार म्हणजे तुमच्या मनात काहीतरी ठरलं आहे. त्यांनी मला यानंतर होय मी पक्ष सोडणार आहे असं म्हटल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. “ते जर पक्ष सोडणार असतील तर त्या ठिकाणी दुसरा अध्यक्ष असल्याशिवाय पर्याय नाही. मी अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आता ते पक्ष सोडणार, अध्यक्ष हा द्यावाच लागतो त्यामुळे नामदेव भगत यांची नियुक्ती केल्याची घोषणा करतो,” असेही ते म्हणाले.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या चार नेत्यांची, चार दिशेला तोंडे