पार्थ पवार सकाळी सकाळी खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 10:55 AM2019-04-21T10:55:22+5:302019-04-21T10:55:56+5:30
कधी ट्रेनने प्रवास, कधी रिक्षाने, घोड्यावर सवारी, रस्त्यावर धावाधाव, भजन, पंगतीला जेवण वाढण्यासारख्या गोष्टींमुळे सतत ट्रोल झालेल्य़ा पार्थ पवारांनी आज सकाळी खारघरमध्ये नागरिकांशी संवाद साधला.
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नातू पार्थ पवार आज सकाळीच खारघरमधील सेंट्रल पार्कमध्ये आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. रविवार सुटीचा दिवस असल्याने पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी 8 च्या सुमारास पार्थ पवार पार्कमध्ये आले होते.
कधी ट्रेनने प्रवास, कधी रिक्षाने, घोड्यावर सवारी, रस्त्यावर धावाधाव, भजन, पंगतीला जेवण वाढण्यासारख्या गोष्टींमुळे सतत ट्रोल झालेल्य़ा पार्थ पवारांनी आज सकाळी खारघरमध्ये नागरिकांशी संवाद साधला. यावेळी खारघर शहरातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश घरत व आघाडीचे काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. मॉर्निंगवॉकला आलेल्या नागरिकांना आपली ओळख पटवून देत मतदानाचे आवाहन केले. यावेळी नागरिकांनी देखील पार्थ यांच्याशी संवाद साधला.
पार्थ पवार हे उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेटकऱ्यांमध्ये ट्रोल होत आहेत. पहिले भाषण, उलट्या रेल्वेने प्रवास, विनाकारण पळापळ, मुंबई महामार्गावरून जात असल्याने मावळमधून निवडणूक लढवित असल्याचे सांगितल्याने अगोदरच ट्रोल झालेले आहेत. दापोडीतील विनियार्ड चर्चचे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांची भेट घेतल्याने ट्रोल झाले होते.
यानंतर सुप्रिया सुळेंनी दाखल केलेल्या शपथपत्रावरूनही ते ट्रोल झाले होते. तब्बल १४२ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वहिनी व भाच्यांकडून तब्बल ५५ लाख रुपये उसने घेतले आहेत. निवडणूक अर्ज दाखल करताना सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात सुळे यांनी ही माहिती दिली आहे.त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्याकडून २२ लाख रुपये आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये उसने घेतले आहेत.