नवी मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच २३ कोटींचा कर वसूल केला आहे. मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या महसुलाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत असल्याने, चालू वर्षातली ही कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी करवसुलीबाबत सुयोग्य नियोजन करण्याच्या दिलेल्या निर्देशामुळे ही कामगिरी होऊ शकली आहे.महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, याकरिता प्रतिवर्षी वेगवेगळी शक्कल लढवली जाते. मात्र, आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत अनेक विभागांकडून आजवर अपेक्षित असलेले उत्पन्नाचे लक्ष्य साध्य होऊ शकलेले नाही. त्यामध्ये मालमत्ता कर विभागाचाही समावेश आहे. सर्वसाधारणपणे आर्थिक वर्षाच्या अखेरीस थकबाकीदारांकडून करवसुलीवर जोर दिला जातो. त्यामध्ये वसुलीचा अंदाज चुकल्यास पालिकेच्याही आर्थिक गणिताचा मेळ जमत नाही. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच मालमत्ता करवसुलीवर भर द्यायचा, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी विभागाला दिले आहेत. त्यानुसार मालमत्ता विभागाचे प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी मालमत्ता करवसुलीचे नियोजन केले आहे. त्याकरिता बिलांचे वाटप झाल्यानंतर काही दिवसांतच नागरिकांनी त्याचा भरणा करण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकाद्वारे संपूर्ण शहरात करण्यात आले. तसेच थकबाकीदारांनाही वेळेत कर भरण्याचे सूचित करण्यात आले होते. यामुळे अवघ्या एप्रिल महिन्यात पालिकेला मालमत्ता करापोटी २३ कोटींचा महसूल मिळाला आहे.मागील तीन वर्षांच्या तुलनेत एका महिन्यात झालेली ही वसुली सर्वाधिक आहे. २०१५-१६मध्ये ११.७६ कोटी, २०१६-१७मध्ये १४.१२ कोटी, तर २०१७-१८ मध्ये ९.७४ कोटी कर वसूल झालेला आहे. त्यामुळे सन २०१८-१९च्या सुरुवातीलाच झालेल्या मालमत्ता कराची वसुली उल्लेखनीय असून, हीच गती कायम ठेवण्याच्या सूचना आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मालमत्ता कर विभागाला केल्या आहेत.
महापालिकेच्या तिजोरीत २३ कोटींची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 1:30 AM