सिडकोच्या ९0 हजार घरांचा प्रकल्प दृष्टिपथात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:11 AM2018-12-16T06:11:50+5:302018-12-16T06:12:13+5:30
मंगळवारी शुभारंभ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : पंधरा हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर सिडकोने आता तब्बल ९० हजार घरांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महागृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या या ९० हजार घरांपैकी ५३ हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असून, उर्वरित ३७ हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत.
नवी मुंबई विभागात विविध घटकांसाठी ९० हजार घरे बांधण्याची जबाबदारी राज्य शासनाने सिडकोवर सोपविली आहे, त्यानुसार सिडकोने आराखडा तयार करून तो मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाच्या सुकाणू समितीने या गृहनिर्मितीला मंजुरी दिली असून, केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर गृहनिर्मितीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ डिसेंबर रोजी कल्याण येथे येत आहेत. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते या महागृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत न भूतो असा महाकाय गृहनिर्माण योजनेचा संकल्प सिडकोने सोडला आहे. सिडकोच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिकदृष्टदा मागास आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी एकाच इतक्या मोठ्या प्रमाणात घरांची निर्मित्ती केली जात आहे. घरे रेल्वे स्टेशन जवळ, पार्किंग जागा, ट्रक टर्मिनल अशा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारली जाणार आहेत. त्यानुसार सिडकोने नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंग, फुडकोर्ट आणि मोकळ्या भूखंडांचा अभ्यास करु न त्या ठिकाणी अडीच एफएसआयच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ८९ हजार ७७१ घरांच्या निर्मितीची योजना आखली आहे. शहरातील बस-ट्रक टर्मिनल, रेल्वे स्थानक संकुलाजवळ घरांची निर्मिती झाल्यास आर्थिकदृष्टदा मागास आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत येण्यास लागणारा वेळ व पैशाची बचत होणार आहे.
कमीत कमी तीन वर्षात ही घरे बांधण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी बांधकाम खर्च कमी होण्याच्या दृष्टीने तज्ञांच्या माध्यमातून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. एकूणच विविध स्तरावर चाचपणी केली जात आहे.
- लोकेश चंद्र,
व्यवस्थापकीय संचालक, सिडको
ंबँकेकडून कमी व्याज दरात सहज कर्ज उपलब्ध व्हावे, यादृष्टीने सिडकोने ही महागृहनिर्माण योजना हाती घेतली आहे. या गृहनिर्माण प्रकल्पात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर घेणाºया आर्थिकदृष्टदा दुर्बल घटकाला २ लाख ५0 हजाराचे तर अल्प उत्पन्न घटकाला २ लाख ६७ हजार रूपयांचे अनुदान इतके अनुदान मिळणार आहे.