यश मिळविण्यासाठी संयम आवश्यक : निरूपणकार सचिन धर्माधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 03:31 AM2018-01-08T03:31:22+5:302018-01-08T03:32:27+5:30
प्रत्येक तरुणाने त्याच्या गरजेनुसार नोकरी अथवा व्यवसाय निवडायला हवा, तर निवडलेल्या नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी संयम, चिकाटी व अभ्यासू वृत्तीची नितांत गरज असल्याचे मनोगत निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांनी रविवारी वाशी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
नवी मुंबई : प्रत्येक तरुणाने त्याच्या गरजेनुसार नोकरी अथवा व्यवसाय निवडायला हवा, तर निवडलेल्या नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी संयम, चिकाटी व अभ्यासू वृत्तीची नितांत गरज असल्याचे मनोगत निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांनी रविवारी वाशी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
तरुणांना व्यवसाय क्षेत्रात मार्गदर्शन केल्याप्रकरणी निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांना ‘नवउद्योग निर्माण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाशीत रंगलेल्या या सत्कार सोहळ्यास श्री सदस्यांची अलोट गर्दी जमली होती.
तरुणांना उद्योग व्यवसाय निर्मितीसाठी मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांनी केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना ‘नवउद्योग निर्माण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाशीत झालेल्या या सोहळ्यासाठी नवी मुंबईसह मुंबई, पनवेल, उरण, ठाणे परिसरातील श्री सदस्यांनी गर्दी केली होती. श्री सदस्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याची भावना निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. प्रत्येकाने आपली बुद्धी अपडेट करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासू वृत्ती संपली की व्यक्ती अंधश्रद्धेकडे वळते. त्यामुळे अज्ञान धुडकारून गंडे, दोरे, ताईत यातून प्रत्येकाने बाहेर येण्याचीही गरज असल्याचेही मार्गदर्शन सचिन धर्माधिकारी यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्टÑभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला जगण्याची योग्य दिशा दाखवल्याचे गौरवोद्गार काढले. या कुटुंबात सचिन धर्माधिकारी यांच्यासारखे दीपस्तंभ निर्माण होत असल्याचाही आनंद त्यांनी व्यक्त केला. या वेळी कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथ शिंदे, निरूपणकार राहुल धर्माधिकारी, आमदार भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको - उद्धव ठाकरे
कोकणात विकासाची बुलेट ट्रेन आल्यावर तिथले निसर्गसौंदर्य आहे तसे राहील का, असे प्रश्नचिन्ह शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले आहे. वाशीतील ग्लोबल कोकण महोत्सवास ते उपस्थित होते. या वेळी त्यांनी आयुष्याची राखरांगोळी करतील असे प्रकल्प कोकणात नको असल्याचे सांगत मेक इन इंडियाच्या माध्यमातून येणाºया काही प्रकल्पांना विरोध दर्शवला. कोकणच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यासाठी वाशीत ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी कोकण हा शिवसेनेचा कणा असल्याने, कोकणच्या विकासासाठी राजकीय जोडे बाहेर काढून सर्वांसोबत येण्याची ग्वाही दिली. परंतु आयुष्याची राखरांगोळी करणारे प्रकल्प कोकणात येत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. मुंबईतले महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला पळवून वादग्रस्त प्रकल्प कोकणात आणले जात आहेत. त्यामुळे कोकणातील निसर्गाची हानी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विकासाचे स्वप्न साकारताना कोकणचे निसर्गसौंदर्यदेखील जोपासले जाणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत, आयुष्याची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको असल्याचे त्यांनी सुचवले. तसेच विकासाची बुलेट ट्रेन आल्यावर कोकणचे निसर्गसौंदर्य टिकेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोकणचा फायदा होईल असेच उद्योग-व्यवसाय तेथे आले पाहिजेत, परंतु त्यामध्ये कामगारवर्ग बाहेरचा असल्यास शिवसेना खपवून घेणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. या वेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही कोकणचा विकास करताना तिथले निसर्गसौंदर्य जपण्याची गरज व्यक्त केली. त्यानुसार नेमक्या कोणत्या पद्धतीने कोकणचा विकास केला जाऊ शकतो, त्यावर अभ्यास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एक संस्था नेमली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.