नवी मुंबई : सत्ता प्रस्थापित करायची असल्यास जातीची भिंत भेदून राजकारण केले पाहिजे. केवळ एका जातीच्या जोरावर कुठलाच पक्ष देशात आणि राज्यात सत्ता हस्तगत करू शकत नाही. त्यासाठी बहुजन समाजाची साथ आवश्यक असते, असे प्रतिपादन भारिपचे ज्येष्ठ नेते व व्याख्याते प्रा. अविनाश डोळस यांनी केले आहे. भारिप बहुजन महासंघ नवी मुंबईच्या वतीने वाशी येथे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अविनाश डोळस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष आनंद मोहन, ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष द. वि. चंदनशिवे, उपाध्यक्ष भूषण कासारे, सचिव राजाभाऊ बनसोडे, नवी मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सचिन जोगदंड आदी उपस्थित होते. भारिप बहुजन महासंघ हा पक्ष सर्व जाती-जमातींना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. सत्ता मिळविण्यासाठी बहुजन समाजाची साथ गरजेची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने काम करणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डोळस यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्र माचे आयोजन भारिप बहुजन महासंघ नवी मुंबई कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अरु ण गायकवाड यांनी भूषविले, तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष व कामगार नेते प्रदीप बी. वाघमारे यांनी केले. (प्रतिनिधी)
सत्ता मिळविण्यासाठी बहुजन समाजाच्या साथीची गरज
By admin | Published: February 15, 2017 4:54 AM