प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:16 AM2017-10-09T02:16:14+5:302017-10-09T02:16:32+5:30
दिवसेंदिवस शहरात अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याकरिता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
पनवेल : दिवसेंदिवस शहरात अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याकरिता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यास, अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले.
पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस चालक, मालक, शाळेचे प्राचार्य, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
नजीकच्या काळात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया बस चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. अनेक वेळा या बसेसमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरव्यवहार होतात. मात्र, या घटना टाळण्यासाठी पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली जबाबदारी एकमेकांवर न टाकता प्रत्येकाने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.
उपस्थितांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार, सतीश देशमुख, पनवेलचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, पनवेल शहर वाहतूक विजय कादबाने आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना उपस्थित पालकांना व बस चालक मालक, शिक्षकांना करण्यात आल्या. उपस्थितांना वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी व होणारे अपघात टाळण्यासाठी चित्रफीत दाखवून अपघातांच्या संदर्भात उपस्थितांना जागृत करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहतूक नियमांच्या माहितीसंदर्भात स्कूल बस धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.