एपीएमसीमधील चाचणी केंद्रांची वेळ वाढविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:43 AM2020-11-27T00:43:23+5:302020-11-27T00:43:44+5:30
नागरिकांची मागणी : तीन वाजेपूर्वी होतात सर्व केंद्रे बंद
नवी मुंबई : एपीएमसीमधील पाचही मार्केटमध्ये कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. परंतु सर्वच केंद्रे तीन वाजेपर्यंत बंद होत आहेत. किमान कांदा - बटाटा मार्केटमध्ये पाच वाजेपर्यंत ॲँटिजेन व आरटीपीसीआर चाचणीची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगाने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी एपीएमसीमधील सर्व केंद्रे अधिक गतीने सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. मनपा आरोग्य विभागाच्या वतीने केंद्रे सुरू केली आहेत. परंतु सर्व केंद्रे दुपारी तीन वाजेपूर्वीच बंद केली जात आहेत. यामुळे तीननंतर जर कोणाला चाचणी करायची असेल तर त्यांना वाशीमधील पालिका रुग्णालयात किंवा नेरूळमधील मनपा रुग्णालयात जावे लागते. पालिकेने किमान कांदा - बटाटा मार्केटमधील केंद्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवले पाहिजे. अन्यथा केंद्र सुरू करूनही नागरिकांची गैरसोय होत राहील. प्रत्येक केंद्र किती वाजता सुरू होणार व किती वाजता बंद होणार याचा उल्लेख करणेही आवश्यक आहे. बाजार समितीमध्ये निष्काळजीपणा केला जाऊ नये, अशी मागणी होते आहे.
अर्धा तास बसवून परत पाठविले
एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केटमध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजता काही नागरिक चाचणी करण्यासाठी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी दहा मिनिटे थांबण्यास सांगितले. जवळपास अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर आता फक्त ॲन्टिजेन चाचणीच होईल. आरटीपीसीआर चाचणी होणार नाही, असे सांगितले. चाचणीचा वेळ संपलाच होता तर अर्धा तास थांबविले कशासाठी, असा प्रश्न नागरिकांनी केला.