सार्वजनिक आरोग्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:25 AM2020-02-23T01:25:41+5:302020-02-23T01:25:47+5:30
केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे मत; पनवेल येथील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
पनवेल : सध्या भारतात काहीच संस्थांमध्ये सार्वजनिक आरोग्याचे शिक्षण दिले जाते. यापैकी राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन ही संस्था महत्त्वाची आहे. सध्या सार्वजनिक आरोग्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मत केंद्र्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या पनवेल येथील नवीन संस्थात्मक संकुलाचे उद्घाटन डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत आदींसह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवासी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाºया इमारतीच्या कोनशिलेचेसुद्धा या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आयुष्मान भारत योजना आम्ही चांगल्या पद्धतीने राबवित आहोत. या योजनेअंतर्गत सुमारे ८६ लाख जणांनी आपला सहभाग नोंदविला आहे. मागील ७० वर्षांत आरोग्यसेवेबाबत ज्या पद्धतीने काम होणे गरजेचे होते ते झाले नसल्याची खंत व्यक्त करीत याला काँग्रेस सरकार जबाबदार असल्याचा आरोप डॉ. हर्षवर्धन यांनी या वेळी केला.
या अभ्यासक्रमाचा समावेश
संस्थेत पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण वेळेचे दोन प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केअर हे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये सॅनिटरी हेल्थ इन्पेक्टर कोर्स, डायबेटीस एज्युकेटर, फर्स्ट रिस्पाँडर, होम हेल्थ एड, जनरल ड्युटी असिस्टंट आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रमुख समुदायांवर आधारित संशोधन उपक्रमसुद्धा या संस्थेतर्फे राबविले जातात. या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संकुलात भारतासह दक्षिण पूर्व आशियामधून येणाºयांना आधुनिक दर्जाची प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.