जंकफूडपासून तरुण पिढीचे आरोग्य वाचविण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:57 AM2019-07-22T02:57:28+5:302019-07-22T02:58:05+5:30
डॉ. पल्लवी दराडे : शाळा, महाविद्यालयांच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष लक्ष
नवी मुंबई : लहान मुलांसह तरुण पिढी जंकफुडच्या आहारी चालली आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने देशाच्या भावी पिढीला वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याकरिता शाळा व महाविद्यालयांच्या कॅन्टीनमधून जंकफुड हद्दपार करण्याचे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली. ‘लोकमत’च्या वतीने आयोजित ‘सखी सन्मान’ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने त्या नेरूळ येथे उपस्थित होत्या.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगर क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्कारासाठी ‘लोकमत’ समूहाच्या वतीने ‘सखी सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नेरूळ येथील तेरणा डेंटल महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी हा सोहळा संपन्न झाला. तेरणा हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून विजय नाहटा फाउंडेशन हे पार्टनर होते. तर पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि. हे सहप्रायोजक होते. या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्षा व प्रसिद्ध लेखिका विजया वाड यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लेखिका विजया वाड यांनी विशेष महिलांच्या सत्कारासाठी आयोजित केलेल्या या देखण्या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी मुलांच्या बदलत चाललेल्या खाद्यसंस्कृतीकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. लहान मुलांसह तरुणांमध्ये जंकफुड खाण्याची सवय वाढत चालली आहे, त्यामुळे कमी वयातच त्यांना डायबिटीस तसेच हृदयविकाराचे आजार होत आहेत. एका संस्थेमार्फत एमएमआर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या चाचणीत प्रत्येक १०० पैकी ३० मुलांमध्ये डायबिटीसचे निदान झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे मुलांना जंकफुड खाण्यापासून वेळीच न थांबवल्यास देशाची भावी पिढी संकटात येऊ शकते.
राज्यातील सर्वच शाळा व महाविद्यालयांच्या कॅन्टीनमधून जंकफुड हद्दपार करण्याचा निर्णय घेतला असून, २५ हजार शाळांना तशा मार्गदर्शक सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर या मोहिमेत पालकांनीही सहभागी होऊन मुलांना जंकफुड खाण्यापासून अडवून त्यांचे स्वास्थ्य निरोगी राखण्याचाही त्यांनी सल्ला दिला.
कार्यक्रमास ‘लोकमत’ समूहाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, शिवसेना उपनेते विजय नाहटा, सिनेअभिनेत्री अदिती गोवित्रीकर, तेरणा रुग्णालयाचे संतोष साईल, पितांबरीच्या जनरल मॅनेजर गीता मणेरीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका उत्तरा मोने यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले.
महिलांनो, खूप हसा...
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित सिनेअभिनेत्री व मिसेस वर्ल्ड अदिती गोवित्रीकर यांनी महिलांना खूप हसण्याचा सल्ला दिला. दैनंदिन कामकाजामध्ये महिलांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र, विरंगुळ्याच्या माध्यमातून महिलांनी हसण्याला प्राधान्य दिल्यास अनेक व्याधी सहज दूर होतील, असाही सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार आपल्या आगामी ‘स्माईल प्लीज‘ या चित्रपटाबद्दलही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
आपल्याही दोन मुली असून, त्यांनीही त्यांच्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. यामुळे मुली जन्माला आल्या म्हणून कोणत्याच पालकांनी निराश होण्याची आवश्यकता नाही. - विजया वाड, प्रसिद्ध लेखिका
महिलांच्या सन्मानासाठी अत्यंत देखणा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुलींसह महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. ‘लोकमत’ने माझ्या कार्याची घेतलेली दखल मला भविष्यात प्रोत्साहन देणारी ठरेल. - जेमिमा रॉड्रिग्ज,
भारतीय क्रिकेटपटू
सध्या सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. यानंतरही समाजातील काही घटकांकडून अद्यापही पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमीच लेखले जाते. अशातच ‘लोकमत’ समूहाने ‘सखी सन्मान’ सोहळा आयोजित करून कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला. यामुळे महिलांना नक्कीच पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे. - पुष्पलता दिघे, सहायक पोलीस आयुक्त