पेण : राज्यातील देवेंद्र सरकार व स्वत: मुख्यमंत्री विकासाच्या पथावर मार्गक्रमण करीत असताना शेकापच्या सर्वांगीण विकासात पेण शहराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकने आरोप-प्रत्यारोपाचे दिवस संपलेत, आता भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त प्रशासनावर भाजपाचा विकासरथ चालत असून पारदर्शक, गतिमान प्रशासन व स्मार्ट सिटी या बाबींवर सरकारचा भर आहे. सरकारच्या प्रामाणिक इशाऱ्यांनी गल्लीतला गोंधळ दूर होत आहे. जनता थेट सरकारच्या प्रामाणिक प्रशासनावर खूश असल्याने दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र सरकार जनहिताची कामे करीत असल्याने पेणच्या मतदारांनी पेण शहराचा सर्वांगीण विकासासाठी २७ नोव्हेंबरला सर्जिकल स्ट्राइक करून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा, असे प्रतिपादन महावीर मार्गावरील चौक सभेत रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केले. यावेळी नगर विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन के ले.यावेळीआ. संजय केळकर, आ. प्रशांत ठाकूर व शेकाप आ. धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते. पेणच्या या प्रचाराच्या चौक सभेत पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या प्रश्नाशी आम्ही प्रामाणिक आहोत, कालही होतो, आजही आणि उद्याही राहू, असे या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावलेले आ. धैर्यशील पाटील व आ. केळकर यांनी स्पष्ट करून पेण अर्बनच्या ठेवीदारांच्या केल्या जाणाऱ्या दिशाभूलवर चांगलाच प्रहार केला. पेण पालिकेने ही निवडणूक विकास व्हिजन व नागरी सुविधांबाबत असून गेल्या पाच वर्षात जे तुमच्या तंबूत होते तेव्हा तुम्हाला चालले, आता मात्र त्यांच्यावर दोषारोप करून दूषणे देण्यात तुमची स्वार्थी भूमिका स्पष्ट होते. तर शहराच्या नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात तुम्हाला का अपयश आले, याची जनतेला चांगली माहिती आहे. विकासाच्या नावाखाली टक्केवारीचा आलेख उंचावून स्वत:च्या कुटुंबाचा विकास करण्यावर भर दिला असे नाव न घेता आ. धैर्यशील पाटील यांनी सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तर सत्ताधारी मंडळींच्या दादागिरीला न भिणारे आम्ही इथे बसलोत त्यामुळे नागरिकांनी यांची चिंता करू नये, असे आ. प्रशांत ठाकूर म्हणाले. पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी प्रथमच स्पष्ट केले की, नागरिकांनी बनविलेल्या नगर विकास आघाडीमध्ये आम्ही सामील झालो. आ. धैर्यशील पाटील यांच्यासारखा स्वच्छ माणूस व लोकप्रतिनिधी आमच्या सोबत असल्याने आमचं पटलं, पण काही मंडळींना हे कसं काय असा धसका बसला. पेण शहराच्या विकासाचा २५ वर्षांचा व्हिजन प्लॅन करणारी मंडळी या आघाडीत आहेत असा ठाम विश्वास पालकमंत्री मेहता यांनी दिला. (वार्ताहर)
पेणमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची आवश्यकता
By admin | Published: November 16, 2016 4:35 AM