खासगीकरण रोखण्यासाठी एकजुटीची गरज, उरणमध्ये जेएनपीटीतील कामगार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:12 AM2020-01-11T00:12:51+5:302020-01-11T00:12:55+5:30
देशातील एकमेव नफ्यात चालणाऱ्या जेएनपीटी बंदराचे खासगीकरण कोणी करू पाहत असेल तर येथील प्रकल्पग्रस्त, कामगार ते कदापि सहन करणार नाहीत.
उरण : प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर उभे राहिलेले, देशातील एकमेव नफ्यात चालणाऱ्या जेएनपीटी बंदराचे खासगीकरण कोणी करू पाहत असेल तर येथील प्रकल्पग्रस्त, कामगार ते कदापि सहन करणार नाहीत. जेएनपीटीच्या खासगीकरणाचा डाव उधळून लावण्यासाठी प्रकल्पग्रस्त, कामगार आणि कामगार संघटना यांनी संघटित होण्याचे आवाहन कामगारनेते तथा जेएनपीटी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील यांनी शुक्रवारी आयोजित कामगार मेळाव्यात केले.
जेएनपीटी रुग्णालयाचे, त्यानंतर जेएनपीटी बंदराचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी जेएनपीटी कामगार एकता संघटना संलग्न आॅल इंडिया पोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशन यांच्या माध्यमातून जेएनपीटी वसाहतीमधील मल्टिपर्पज हॉलमध्ये शुक्रवारी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हीच ती वेळ खासगीकरण रोखण्याची, अशी हाक देत आयोजित करण्यात आलेल्या कामगार जागृती मेळाव्यात सुमारे ४०० कामगार उपस्थित होते. कामगारांना मार्गदर्शन करताना एकता संघटनेचे अध्यक्ष तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी दिनेश पाटील हे बोलत होते.
जेएनपीटी बंदरात काम करणारे कामगार हे प्रकल्पग्रस्त आहेत. त्या कामगारांचे हीत न जपता, तसेच मयत कामगारांच्या वारसांना, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेता जेएनपीटी व्यवस्थापन एमजीएम,डी. वाय. पाटील यांच्याबरोबर रुग्णालयाचे पीपीपी धोरण अवलंबून जेएनपीटीचे खासगीकरण करीत असतील तर हा हुतात्म्यांचा, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून उभारण्यात आलेल्या बंदरात काम करणाºया कामगारांचा अवमान आहे. तो कदापि सहन करणार नाही. त्या विरोधात व येथील कामगारांना, त्यांच्या वारसांना आणि प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि व्यवस्थापनाचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी एकसंघ होऊ या, असा निर्धारही दिनेश पाटील यांनी व्यक्त केला.
>जेएनपीटी कामगार एकता संघटनेच्या माध्यमातून कामगारनेते दिनेश पाटील हे व्यवस्थापनाच्या बोर्ड बैठकीत कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. त्यांनी कुणाल ठाकूर व स्वप्निल भोईर या मयत कामगारांच्या वारसांना बंदरात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे काम केले आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी झगडणारे कामगारनेते दिनेश पाटील यांच्या पाठीशी कामगार, प्रकल्पग्रस्तांनी खंबीरपणे उभे राहाण्याचे आवाहन पंडित घरत यांनी केले. या वेळी किरण जिकमाडे, सुषमा म्हात्रे, पी. वाय. कडू, सचिन कडू, नागेश भोईरकर, डॉ. सकपाळ, गणेश म्हात्रे, एल. जी. म्हात्रे, अरुण कडू यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. या वेळी कामगारांनी खासगीकरण धोरणाविरोधात घोषणाबाजीही केली.