२२ दिवसांच्या बाळाच्या पोटात सुई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:28 AM2018-07-20T03:28:00+5:302018-07-20T03:28:14+5:30
पनवेलच्या रुग्णालयात लसीकरणादरम्यान घडला प्रकार
मुंबई : पनवेल येथील एका रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाला सामान्य लसीकरणादरम्यान लस देण्यात आली. त्यानंतर २२ दिवसांनी त्या बाळाला ताप येत असल्याचे निदर्शनास आले.
अचानक बाळाच्या उजव्या मांडीला सूज आली. तपासण्यांअंती लसीकरणादरम्यान बाळाच्या शरीरात सुई राहिल्याचे दिसून आले. अखेर १९ दिवसांनंतर परळ येथील वाडिया रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे ही सुई काढण्यात डॉक्टरांना यश आले.
पनवेल येथील रुग्णालयात आस्था सुधाकर पाष्टे यांनी बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळाला ताप येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बाळाच्या पालकांनी बालरोगतज्ज्ञांची भेट घेतली. डॉक्टरांनी त्यांना बाळाचे एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड चाचणी करण्याचा सल्ला दिला. यावेळी बाळाला उजव्या बाजूच्या कुल्ह्यांच्या सांध्यामध्ये आॅस्टिओमायलायटिस असल्याचे निदान करण्यात आले.
वाडिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळावर आॅस्टिओमायलायटिससाठी उपचार सुरू करण्यात आले. तेव्हा एक्स-रे अहवालात त्या बाळाच्या डाव्या कुल्ल्याच्या भागात फॉरेन बॉडी (बाहेरील वस्तू) दिसून आली. सुरुवातीला ती एक वस्तू वाटली, पण त्यानंतर काढलेल्या एक्स-रे अहवालात ती वस्तू सातत्याने दिसत होती. त्यामुळे सीटी स्कॅन करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सीटी स्कॅनच्या अहवालानुसार ती फॉरेन बॉडी म्हणजे लसीकरणादरम्यान वापरण्यात आलेली सुई असल्याचे निश्चित करण्यात आले. बाळाच्या शरीरात सुई गेली कशी याबद्दल बाळाच्या पालकांना काहीही माहिती नव्हती.
वाडिया रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून डाव्या कुल्लाच्या सांध्यातील सुई काढली. बाळाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी अचूक निदान करून ताबडतोब उपचार केले. त्यामुळे डॉक्टरांनीच आमच्या बाळाचा जीव वाचवला आहे. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
> बाळावर इन्ट्रा-आॅपरेटिव्ह शस्त्रक्रिया
आॅस्टिओमायलायटिस या हाडांना झालेल्या संसर्गासाठी बाळावर उपचार करत होतो. पण त्यानंतर सीटी स्कॅन करण्यात आले आणि बाळाच्या डाव्या कुल्ल्यामध्ये सुई असल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात जेव्हा पालकांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी पनवेलमधील स्थानिक नर्सिंग होममध्ये बाळाला इन्ट्रा मस्क्युलर (स्नायूच्या आत) लस देण्यात आली होती. तुटलेली सुई १९ दिवस बाळाच्या शरीराच्या आत होती. बाळाला कदाचित ती टोचत नसावी किंवा ते वेदना व्यक्त करू शकत नसावे. पालकांना याबाबत कल्पना दिल्यानंतर ही सुई बाळाच्या शरीरातून काढण्यात आली. ही फॉरेन बॉडी काढण्यासाठी बाळावर इन्ट्रा-आॅपरेटिव्ह शस्त्रक्रिया करण्यात आली. ही सुई नक्की कुठे आहे, ते शोधून काढणे कठीण होते. सी-आर्म गायडन्स लोकलायझेशन्सचा उपयोग करून ती सुई काढण्यास दोन तासांचा कालावधी लागला. ही २ सेंटीमीटर लांबीची सुई डाव्या कुल्ह्याच्या सांध्याच्या प्रावरणाला चिकटलेली होती. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती कोणत्याही गुंतागुंतीविना सामान्य झाली.
- डॉ. प्रज्ञा बेंद्रे, बालशल्यविशारद
वैद्यकीय तंत्रांच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक
वैद्यकीय सेवा पुरवठादार असता तेव्हा वैद्यकीय तंत्रांच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. वाडिया हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक तंत्रे वापरण्यात येतात, जेणेकरून रुग्णांना सुरक्षित सेवा प्रदान करता येते आणि त्याचे उत्तम परिणाम साधले जातात.
- डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी