घोट नदीत आढळले मृत मासे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:24 AM2017-10-25T02:24:16+5:302017-10-25T02:24:20+5:30

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय सध्याच्या घडीला ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस विविध घटनांनी येथील प्रदूषणाचा विषय चर्चेत येत आहे.

Neglect of the dead fish, Maharashtra Pollution Control Board, found in river Ghat | घोट नदीत आढळले मृत मासे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

घोट नदीत आढळले मृत मासे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

Next

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय सध्याच्या घडीला ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस विविध घटनांनी येथील प्रदूषणाचा विषय चर्चेत येत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा घोट नदीत मेलेल्या माशांचा खच पडल्याने येथील मच्छीमार हवालदिल झाला आहे. मागील महिन्यात अशीच घटना या नदीत घडली होती.
यापूर्वी झालेल्या घटनेमध्ये महाराष्ट्र औद्योगिक प्रदूषण मंडळाच्या अधिका-यांनी दूषित पाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्याने अशाप्रकारे घटना घडली असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, वारंवार अशाप्रकारच्या घटनांमुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण मोठ्या संख्येने वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत कासाडी व घोट नदी सध्याच्या घडीला अस्तित्वात आहेत. मात्र प्रदूषणामुळे या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या दोन्हीही नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित पाणी सोडल्याने वारंवार या नदीमधील जीवसृष्टी धोक्यात आली असल्याचा आरोप येथील नगरसेवक हरेश केणी यांनी केला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी करून देखील याबाबत कारवाई केली जात नसल्याचे केणी यांनी सांगितले. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय नुकताच शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लवादाच्या समोर मांडला आहे. पुढील महिन्यात यासंदर्भात सुनावणी देखील पार पडणार आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील या दोन्हीही नद्यांमध्ये येथील स्थानिक मच्छीमार मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात. अनेक वर्षांपासून हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने या अशा घटनांमुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे अशा प्रदूषणामुळे पाण्यात मच्छीमारीसाठी उतरणाºया मच्छीमारांना त्वचेचे आजार देखील जडत आहेत. घोट नदीमधील घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच नगरसेवक हरेश केणी, अरविंद म्हात्रे व घोट गावातील ग्रामस्थांनी या नदीची पाहणी केली. या वेळी या नदीमध्ये माशांचा अक्षरश: खच पडल्याचे दिसून आले. या घटनेसंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Neglect of the dead fish, Maharashtra Pollution Control Board, found in river Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.