मार्केटच्या पुनर्बांधणीकडे मनपाचे दुर्लक्ष
By admin | Published: November 24, 2015 01:40 AM2015-11-24T01:40:38+5:302015-11-24T01:40:38+5:30
मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले कोळी बांधवांचे गाव, अशी ओळख असलेल्या दिवाळे गावातील मासळी बाजाराला समस्यांनी वेढले आहे.
नवी मुंबई : मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले कोळी बांधवांचे गाव, अशी ओळख असलेल्या दिवाळे गावातील मासळी बाजाराला समस्यांनी वेढले आहे. अपुरे नियोजन, जागेअभावी या ठिकाणी असलेल्या मासळी विक्रेत्यांनी रस्त्याची अडवणूक केली आहे. या मासळी बाजारात दरदिवशी वेगवेगळ््या भागांतील नागरिक मासे खरेदीसाठी येतात. मात्र या ठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावरच गाड्या उभ्या करून मासे खरेदी केली जाते. त्यामुळे येथील रस्त्यावर वाहतुकीस अडथळे निर्माण होतात आणि विक्रेत्यांनी पदपथावरील जागा अडवल्याने येथे चालणेही मुश्कील होत आहे.
नवी मुंबर्ई पालिकेने या मासळी बाजाराच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी अनेक समस्या उद्भवत आहेत. या ठिकाणी वेळोवेळी साफसफाई न केल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून, त्या ठिकाणी असलेले नादुरुस्त पंखे, विक्रेत्यांना टोपल्या ठेवण्यासाठी जागा नसल्याने मासळी बाजारात जागेचा प्रश्न उद्भवत आहे. मासे विक्रेत्यांना जागेचे अचूक वाटप न करून दिल्याने विक्रेत्यांची मनमानी वाढत असून, नवीन विक्रेत्यांना मात्र या मनमानीला सामोरे जावे लागत आहे. या मासळी बाजारात प्रत्येक विक्रेत्याला तीन फुटाच्या अंतरावर एक भिंत बांधून जागा उपल्बध करून दिली, तर जागेअभावी बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे होणारी रस्त्याची अडवणूक थांबविता येईल, असे मत येथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले; तर सर्व सोयीसुविधांयुक्त तसेच मोठी जागा असलेले मासळी बाजार प्रशासनाने उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी असलेल्या मासळी विक्रेत्यांनी केली. स्थानिक नगरसेविका भारती कोळी यांनी या मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणीची मागणी केली असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून लाभार्थींना या ठिकाणी जागेचे वाटप केले जाणार असून, पुनर्बांधणीचा प्रस्तावही लवकर मार्गी लावण्यात येईल.