- नामदेव मोरे नवी मुंबई : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नवी मुंबईसह पनवेलमध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जात आहे. परंतु उपलब्ध वृृक्षांचे संवर्धन व त्यांच्यावर होणारे आघात थांबविण्यासाठी काहीही यंत्रणा उपलब्ध नाही. वृक्षांना खिळे ठोकून त्यावर बॅनर लावले जातात. मॉल्स, दुकानांसमोरील वृक्ष जाणीवपूर्वक हटविले जात आहेत. झाडांच्या वेदनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून स्मार्ट सिटीमध्येही खिळेमुक्त झाड अभियान राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.कोपरखैरणेमधील पंचरत्न हॉटेलजवळ झाडाला लागून लोखंडी पोल रोवण्यात आले होते. वृक्षाची वाढ झाल्यामुळे तो पोल वृक्षाच्या बुंध्यामध्ये गेला असून गंजलेल्या पोलमुळे वृक्षाच्या आयुर्मानामध्ये फरक पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी वाशीमधील काही मोठ्या दुकानांसमोरील वृक्ष अचानक सुकले. सानपाडामधील एक शाळेच्या समोरही अशीच घटना घडली होती. एखादे दुकान, शोरूम किंवा मोठ्या आस्थापनांच्या प्रवेशद्वारासमोरील वृक्षच कसे सुकतात याकडे कधीच कोणी लक्ष देत नाही. झाडांवर विषप्रयोग केल्याचे आरोपही होतात, परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. शहरातील हजारो झाडांवर नागरिकांनी त्यांच्या फायद्यासाठी खिळे ठोकले आहेत. अनेकांनी होर्डिंग, दुकानांचे नामफलक, विद्युत रोषणाई व इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात खिळे ठोकले आहेत. काही ठिकाणी वृक्ष लागवड केल्यानंतर सुरक्षेसाठी तारेचे कुंपण लावले जाते. परंतु वृक्षाची वाढ सुरू झाल्यानंतर ते कुंपण काढले जात नाही व ते पुढे मुळांमध्ये जाते. खिळे गंजले की त्याचे विष झाडांमध्ये उतरते व अनेक वेळा पावसाळ्यात किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये वृक्ष कोसळून जातात किंवा सुकतात. नवी मुंबई व पनवेलमध्ये अनेक ठिकाणी झाडांना वेदना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पुणे शहरामध्ये आंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेने खिळेमुक्त झाड ही चळवळ सुरू केली आहे. पनवेलमधील कामोठेमध्ये एकता सामाजिक संस्थेने हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. परंतु नवी मुंबईमध्ये मात्र अद्याप पर्यावरणप्रेमी व वृक्षपे्रमींनी अशाप्रकारचा उपक्रम सुरू केलेला नाही. पर्यावरण रक्षणासाठी फक्त वृक्षलागवड करून उपयोग नाही. उपलब्ध वृक्षांचे रक्षण करण्याची जबाबदारीही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व सर्वच नागरिकांनी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दोन्ही महापालिका क्षेत्रामध्ये ही चळवळ उभी राहिली व वृक्ष संवर्धनासाठी जनजागृती झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.>दहा शहरांमध्ये चळवळपुण्यामधील माधव पाटील यांनी आंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खिळेमुक्त अभियान सुरू केले. चार ते पाच तरूणांनी सुरू केलेल्या या अभियानामध्ये अल्पावधीमध्ये शेकडो स्वयंसेवक झाले. प्रत्येक रविवारी विभागामधील झाडांमधील खिळे काढण्यास सुरवात झाली. पाहता पाहता शेकडो झाडे खिळेमुक्त झाली. ही चळवळ मुंबईसह राज्यातील दहापेक्षा जास्त शहरांमध्ये सुरू झाली आहे.>कामोठेमध्येही खिळेमुक्तीचे कामआंघोळीची गोळी या संस्थेपासून प्रेरणा घेऊन पनवेलमधील एकता सामाजिक संस्थेने कामोठे परिसरामध्ये खिळेमुक्त झाड अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी सांगितले की, झाडांच्या वेदनाकडे दुर्लक्ष केले जाते. झाडांवर खिळे ठोकल्यामुळे त्यांचे आयुर्मान कमी होते. वृक्ष कोसळण्याची शक्यता वाढते. यामुळे आम्ही झाडांना ठोकलेले खिळे काढण्यास सुरवात केली असून या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.>कारवाईची गरजनवी मुंबई महानगरपालिका शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करत असते. परंतु दुकान मालक व इतर नागरिक त्यांच्या फायद्यासाठी वृक्षांमध्ये खिळे ठोकत असतात. वृक्षांना मोठ्या प्रमाणात इजा पोहचविली जाते. चुकीच्या पद्धतीने वृक्षांचे नुकसान करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शहरातील हॉटेल व बारच्या बाहेरही झाडांवर रोषणाई केली जाते. त्यासाठीही खिळे ठोकले जातात. संबंधित हॉटेल मालकांवरही कारवाई करण्याची गरज आहे.
झाडांच्या वेदनांकडे शहरवासीयांचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 2:40 AM