कोरोनाविषयी निष्काळजीपणा ठरतोय घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:25 AM2021-04-24T01:25:48+5:302021-04-24T01:26:10+5:30
४९ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास; वेळेत उपचार न घेतल्यामुळे धोका
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोना चाचणीविषयी गैरसमज व दिरंगाई रुग्णांसाठी प्राणघातक ठरत आहे. वेळेत उपचार न घेतल्यामुळे अनेकांची प्रकृती चिंताजनक होत असून, त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागत आहे. सद्यस्थितीमध्ये रुग्णालयात उपचार घेणारे ४९ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी केली व उपचार सुरु केल्यास मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.
नवी मुंबईमध्येही कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली आहे. रुग्णालयांमधील जागा अपुरी पडू लागली आहे. प्रतिदिन ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये वेटिंग लिस्ट लावण्यात आली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ९६२४ असून, त्यापैकी ४५८१ रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी तब्बल ४९ टक्के रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागत आहे. प्रतिदिन ५२ टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजन मिळविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी टास्क फोर्स तयार करावा लागला आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची मागणी वाढू लागली आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. रुग्णांना जागा मिळविताना नातेवाईक, राजकीय कार्यकर्ते व आरोग्य विभाग सर्वांचीच दमछाक हाेत आहे.
ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे तरुणांनाही ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासत आहे. कोरोनाविषयी गैरसमजामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. लक्षणे दिसू लागल्यानंतर व रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही अनेकजण चाचणी करुन घेत नाहीत. चाचणी केली की, अहवाल पॉझिटीव्हच येतो, असा लोकांनी गैरसमज घेतला जात आहे. लक्षणे दिसल्यानंतर चाचणी करण्याऐवजी फॅमिली डॉक्टरकडून औषधे घेऊन तीन - चार दिवस फुकट घालवले जात आहेत.
चाचणी पॉझिटिव्हच येते हा गैरसमज
कोरोनाची चाचणी केली की, अहवाल पॉझिटीव्हच येतो, हा गैरसमज आहे. नवी मुंबईमध्ये ८ लाख ६२ हजार ६०३ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी फक्त ८८,०३४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तब्बल ७ लाख ७४ हजार ५५९ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. फक्त १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असून, ९० टक्के निगेटिव्ह आहेत. यामुळे कोणताही गैरसमज करून न घेता लक्षणे दिसली की, चाचणी करणे महत्त्वाचे आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये नागरिकांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी करून घेणे आवश्यक आहे. वेळेत उपचार सुरु झाल्यास प्रकृती चिंताजनक होण्याचा व मृत्यू होण्याचा धोका कमी होतो.
- अभिजीत बांगर, आयुक्त