अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने पालिका आयुक्तांवरील ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:48 AM2021-04-23T00:48:19+5:302021-04-23T00:48:26+5:30

कारवाईची मागणी : लोकप्रतिनिधींचे फोन घेण्यास होतेय टाळाटाळ 

The negligence of the officers increased the stress on the Municipal Commissioner | अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने पालिका आयुक्तांवरील ताण वाढला

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने पालिका आयुक्तांवरील ताण वाढला

Next



लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक वर्षापासून महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी दिवस - रात्र परिश्रम घेत आहेत. अनेक जण कौतुकास्पद काम करत आहेत; परंतु अनेक   अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोनही घेत नाहीत. यामुळे नाइलाजाने छोट्या कामासाठी आयुक्तांना संपर्क करावा लागत आहे.  निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. 
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. रुग्णालयात आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध होत नाहीत. पाठपुरावा करूनही बेड न मिळाल्यानंतर नागरिक लोकप्रतिनिधींना संपर्क करत आहेत. लोकप्रतिनिधी दिवस - रात्री सर्व रुग्णालय व अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवून रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागील काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींना प्रशासनाविषयी वाईट अनुभवही येऊ लागले आहेत. कोरोनाची जबाबदारी असणारे अनेक नोडल अधिकारी, डॉक्टर्स लोकप्रतिनिधींचेही फोनही घेत नाहीत. त्यांना योग्य माहिती देत नाहीत. यामुळे नागरिक व लोकप्रतिनिधींविषयी नाराजी वाढू लागली आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीही आयुक्तांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली असून निष्काळजीपणा करणारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर स्वत: नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी जास्तीत जास्त संपर्कात राहत आहेत. त्यांना दिलेली निवेदने, समाज माध्यमांवरून आलेल्या संदेशांचीही दखल घेत आहेत. फोनवरूनही प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत आहेत; परंतु इतर अधिकारी मात्र फोनही उचलत नाहीत.  आयुक्तांनी जबाबदारी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना नागरिक व लोकप्रतिनिधींशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना द्याव्या व जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात 
आहे. 

सुटीवर गेलेल्यांवर कारवाई करावी
मनपाच्या सेवेत असणारे अनेक अधिकारी व कर्मचारी वर्षभर सुटी न घेता काम करत आहेत. दुसरीकडे काही डॉक्टर्स कोरोना काळात त्यांची मनपाला गरज असताना दीर्घ मुदतीच्या सुटीवर गेले आहेत. तीन महत्त्वाचे डॉक्टर्स काही महिन्यांपासून सुटीवर आहेत. इतर विभागामध्येही काही कर्मचारी आहेत. आणीबाणीच्या काळात दीर्घ मुदतीच्या सुटीवर जाणारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रशासनाशी संपर्क साधत असतो; परंतु अनेक अधिकारी फोनही उचलत नाहीत. फोन न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांविषयी नावांसह  तक्रार आम्ही आयुक्तांकडे करणार आहोत. 
-अनिकेत म्हात्रे, सरचिटणीस, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश

Web Title: The negligence of the officers increased the stress on the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.