धोक्याच्या सूचनांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष
By Admin | Published: February 3, 2016 02:22 AM2016-02-03T02:22:15+5:302016-02-03T02:22:15+5:30
सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
जयंत धुळप/आविष्कार देसाई, अलिबाग
सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सारा महाराष्ट्र हादरून गेला आणि कोकणातील समुद्रात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या पर्यटकांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
कोकणात आणि विशेषत: रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीत आजवर समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्यामागे किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांच्या धोकाविषयक सूचना नाकारणे, बेफिकिरीने समुद्राच्या पाण्यात जाणे आणि दुर्दैवी मृत्यू ओढावून घेणे ही एकमेव समान परिस्थिती असल्याचे स्थानिक कोळी बांधव आणि पोलीस यांच्या निरीक्षण आणि नोंदीतून सातत्याने स्पष्ट झाले आहे. सोमवारी मुरुडमध्ये घडलेल्या घटनेच्यावेळीदेखील हीच परिस्थिती अनुभवास आली. मुले-मुली समुद्रात जात असताना स्थानिक नागरिक व जीवरक्षक यांनी आता समुद्राला ओहोटी आहे, असे अनेकदा आवर्जून सांगितले होते. मुलांनी ही धोक्याची सूचना नाकारून समुद्रात प्रवेश केल्याने ही दुघटना झाली. समुद्रात थोड्या अंतरावर एक खांब होता. त्याला हात लावण्याची स्पर्धा या मुलांमध्ये लागली होती. त्या स्पर्धेपोटी ही मुले समुद्रात गेली, अशीही परिस्थिती प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितली आणि अखेर नको तेच दुर्दैवी घडले.
भरती-ओहोटीच्या वेळची ही तत्कालिक घळ निर्मिती व पुनर्भरणाची नैसर्गिक प्रक्रिया अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला, अलिबागचा किनारा येथे अनेकदा अनुभवास येते.
> पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरज
पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर : पर्यटनाच्या सुरक्षिततेसाठी सुस्पष्ट धोरण नसल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश समुद्रकिनारे पर्यटकांच्या जीवावर उठले आहेत. मांडव्यापासून थेट श्रीवर्धनपर्यंतच्या समुद्रकिनारी पर्यटकांची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसून येते. पर्यटनात अग्रेसर असणाऱ्या गोवा राज्याचे अनुकरण केल्यास यातील बरेचसे प्रश्न सुटण्यास निश्चितच मदत मिळणार आहे.
जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, कर्जत माथेरान, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांचा प्रामुख्याने वाटा मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्यक्ष रोजगाराबरोबरच अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मितीही येथे मोठ्या संख्येने होत असल्याचे दिसून येते. वीकेंडला तर पर्यटकांच्या गाड्यांचा ताफाच या पर्यटनस्थळांकडे चाल करून येत असतो.
उपलब्ध आकडेवारीनुसार पर्यटनाच्या हंगामात या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे ६० हजार पर्यटक हे विविध पर्यटनस्थळांना भेट देतात. यातील निम्म्यापेक्षा जास्त पर्यटक हे समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक वेळ घालवित असतात. सुरक्षिततेसाठी अलिबागच्या मेन बीचशिवाय कोठेच सुरक्षा पुरवलेली नाही.अलिबाग नगरपालिकेने लाइफ गार्ड, स्पीड बोट, त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यामध्ये बॅरेकेटिंग केले आहे. सूचना फलक, डेंजर झोन यांची माहिती दिली आहे. परंतु हे फक्त अलिबागच्या मेन बीचसाठीच मर्यादित आहे. मांडवा, सासवणे, किहीम, थळ, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, बोर्ली-मांडला, काशिद, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन ही सर्व पर्यटनस्थळे विविध नगरपालिका अथवा वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अखत्यारित येतात. त्यामुळे पर्यटकांना येथे सुरक्षा व्यवस्था पुरविण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरज आहे.