मयूर तांबडेनवीन पनवेल: दुचाकी, चार चाकी वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये आणि जर अति आवश्यक फोन असेल तर वाहन थांबवून बोलावे. पण तरीही मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.
विशेष म्हणजे शासकीय बस, शासकीय वाहने यांच्यावरील चालकही गाडी चालविताना मोबाइलवर बोलत असताना दिसतात. पोलीसही यात मागे नाहीत. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उजव्या हातात गाडीचे हॅण्डल आणि डाव्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. तर काही गाडी चालवित असताना संदेश वाचत असतात.
मोबाइलवर बोलणे आणि वाहन चालविणे या दोन्ही क्रिया सोबत असतील तर सहाजिकच मोबाइलवर बोलण्याकडे चालकाचे अधिक लक्ष जाते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होऊ शकतो. दुचाकी चालविताना मान वाकडी करून खांदा आणि मानेमध्ये मोबाइल पकडून बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असतात. त्यामुळे अशांना पकडण्याची विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची गरज आहे. दंडात्मक कारवाईबरोबरच वाहन परवाना निलंबित करण्याचे प्रमाण वाढले तरच या अशा वाहनधारकांमध्ये जरब निर्माण होईल. तसेच मोबाइल जप्त केले तर अशा प्रकारांना आळा बसेल.
२०० रुपये दंड वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना पोलिसांनी पकडल्यास २०० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम कमी असल्याने अनेकदा वाहनचालक मोबाइलवर बोलताना आढळून येतात. मात्र चिरीमिरी देऊन त्यांना सोडून दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारवाईची भीती कमी झाली असल्याचे दिसून येते.
पनवेल आणि परिसरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. यापुढेही अशा चालकांवर कारवाई करणार आहोत. वाहन चालविताना कोणीही मोबाइलवर बोलू नये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. आपली काळजी आपणच घ्यावी.तरच अपघातापासून वाचता येईल.- एन. विश्वकारकळंबोली वाहतूक शाखा