संघटनेबाहेरील नेत्यांना मेळाव्याचे आमंत्रण नाही, आचारसंहितेमुळे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:07 AM2019-03-23T05:07:55+5:302019-03-23T05:08:08+5:30
कामगारांच्या हितासाठी राजकीय मतभेद विसरून संघटनेला प्राधान्य देण्याचा निर्णय माथाडी नेत्यांनी घेतला आहे. यामुळे शनिवारी एपीएमसीमध्ये होणाऱ्या मेळाव्याला कोणत्याच पक्षाच्या मोठ्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही.
नवी मुंबई : कामगारांच्या हितासाठी राजकीय मतभेद विसरून संघटनेला प्राधान्य देण्याचा निर्णय माथाडी नेत्यांनी घेतला आहे. यामुळे शनिवारी एपीएमसीमध्ये होणाऱ्या मेळाव्याला कोणत्याच पक्षाच्या मोठ्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. फक्त संघटनेचे पदाधिकारीच कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत.
माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त २३ मार्चला बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. पहिल्यांदाच या मेळाव्याला कोणीही मोठे नेते येणार नाहीत. प्रत्येक वर्षी जयंती व पुण्यतिथीला याच ठिकाणी मेळावा घेण्यात येतो. मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहात असल्यामुळे राज्यातून कामगार या मेळाव्याला उपस्थित राहात असतात.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थापनेपासून संघटना पक्षाबरोबर असल्यामुळे यापूर्वी याच मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला जात होता. २०१४ च्या निवडणुकीच्या अगोदरही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला होता. यानंतर केंद्रात व राज्यात सत्ता बदलल्यामुळे जयंती व पुण्यतिथीला राष्ट्रवादी व काँगे्रसपेक्षा भाजपाच्या नेत्यांची उपस्थिती वाढली.
दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे पुनरुज्जीवन करून नरेंद्र पाटील यांना अध्यक्षपद दिले. देशभर माथाडी कायदा लागू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. यामुळे कामगार नेत्यांमध्ये राजकीय मतभेद सुरू झाले होते.
कळंबोलीमध्ये माढा मतदार संघाच्या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनी सरकारवर टीका केली. दुसऱ्या दिवशी नरेंद्र पाटील यांनी शिंदे व जगताप यांच्यावर टीका केल्यामुळे संघटनेमधील मतभेद विकोपाला गेले होते.
कामगार नेत्यांमधील मतभेदामुळे २३ मार्चला होणाºया मेळाव्यामध्ये नक्की कोणत्या पक्षाचे नेते उपस्थित राहणार व कोणत्या पक्षाच्या बाजूने उभे राहायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. नेत्यांनी राजकीय मतभेद विसरून संघटना अभेद्य ठेवावी, असे मत कामगार व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. यामुळे पुन्हा तीनही प्रमुख नेत्यांनी एकत्र मिटिंग घेऊन राजकीय मतभेद संघटनेमध्ये आणले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. जे ज्या पक्षात असतील त्यांनी त्या पक्षाचे काम करावे; परंतु संघटनेमध्ये राजकारण आणू नये असे निश्चित केले. संघटनेचा पदाधिकारी कोणत्याही पक्षातून निवडणुकीस उभा राहिला तरी त्याचा प्रचार करण्याचे या मिटिंगमध्ये निश्चित करण्यात
आले. यामुळेच पुण्यतिथीच्या कार्यक्रमास कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना न बोलावण्याचे निश्चित करण्यात आले आहे; परंतु संघटनेच्या पदाधिकाºयांनी मात्र आचारसंहिता असल्यामुळे कोणाला बोलावले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
२०१४ चा मेळावा गाजला होता
यापूर्वी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच माथाडी मेळावा झाला होता. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांनी या मेळाव्यामध्ये सातारा व मुंबईची निवडणुकीची तारीख वेगळी आहे, यामुळे सातारा जाऊन मतदान करा व शाई पुसून पुन्हा नवी मुंबईमध्येही मतदान करा, असे उद्गार काढले होते. हे विधान वादग्रस्त ठरून देशभर गाजले होते. यानंतर असे वक्तव्य मिस्कीलपणे केल्याचा खुलासा पवार यांना करावा लागला होता.
नेत्यांच्या भाषणाकडे लक्ष
माथाडी संघटनेचे नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांच्यामधील मतभेद मिटले की नाही, याविषयी अद्याप कामगारांमध्ये संभ्रम आहे. शुक्रवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पाटील गेले असताना त्यांच्यासोबत जगतापही होते. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मेळाव्यात नेते काय भूमिका घेणार याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.