नवी मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाचे कोणतेही सहकार्य न घेता उशिरा का होईना स्वबळावर मेट्रो सुरू करून विश्वास दुणावलेल्या सिडकोने आता आपल्या नैना क्षेत्रात दोन मार्गांवर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्र आणि नैना परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यासाठी नवी मुंबई आणि नैना क्षेत्रासाठी सर्वसमावेशक गतिशीलता योजना अर्थात Comprehensive Mobility Plan तयार करण्यासाठी सिडकोने सल्लागाराचा शोध सुरू केला आहे.
सिडकोने बेलापूर ते पेंधर-तळोजापर्यंतची मेट्रो दोन टप्प्यांत सुरू केली आहे. त्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले असले तरी केंद्र आणि राज्य शासनाकडून कोणतेही अनुदान, मदत घेतलेली नाही. मात्र, आता असे अनुदान हवे असेल तर मोबिलिटी प्लॅन तयार करून तो केंद्र शासनास सादर करावा लागतो. त्यानुसार सिडकोने तयार करण्यासाठी सल्लागाराचा शोध सुरू केला आहे.
नैनात धावणार निओ मेट्रोसिडकोने यापूर्वी नैना क्षेत्रातील दोन मार्गांवर निओ मेट्रो सुरू करण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मे. अर्बन मास कंपनीची नियुक्ती केली आहे. यात उलव्यातील अटल सेतू मार्ग ते आंबिवली आणि दुसरा मार्ग कळंबोली ते चिखले असा असणार आहे. दोन्ही मार्गांची लांबी साधारणत: ३० किमी इतकी असणार असल्याचे सिडकोच्या नैना क्षेत्राचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी लोकमतला सांगितले.
अर्थसंकल्पात मेट्रोसाठी ६१० कोटींची तरतूदसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी संचालक मंडळास सादर केलेल्या २०२४-२५ च्या ११ हजार ९०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात नैना प्रकल्पासाठी ५६९ कोटी ३७ लाख रुपये, तर मेट्रोच्या विस्तारासाठी ६१० कोटींची तरतूद केली आहे.
नैना क्षेत्र विमानतळासह नवी मुंबईच्या जवळ येणारसिडकोने प्रस्तावित केलेले निओ मेट्रोचे जे दोन मार्ग आहेत, त्यातील एक मार्ग अटल सेतू-उलवे ते आंबिवली असा आहे. यातून नवी मुंबई विमानतळ नैनाच्या अधिक जवळ येणार आहे. शिवाय कळंबोली ते चिखले असा दुसरा मार्ग आहे. यामुळे सध्याच्या बेलापूर ते पेंधर मेट्रोमुळे नैना क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नवी मुंबईच्या जवळ येणार आहे. यातून नवी मुंबईतून तळोजा एमआयडीसीत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना लाभ होणार आहे.