- नामदेव मोरेनवी मुंबई : दिघा व तुर्भेसारख्या झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. परंतु नेरूळ, बेलापूर व कोपरखैरणेमधील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाऊ लागली आहे. तीन विभागांमध्ये ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर नजीकच्या काळात रूग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनांची दिघा, तुर्भे परिसरात काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. जूनमध्ये तुर्भे, सानपाडा परिसरात सर्वाधिक रुग्ण होते. जुलैमध्ये या परिसराचा चौथा क्रमांक होता. आॅगस्टमध्ये तो सहाव्या तर सप्टेंबरमध्ये सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी येथील नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी परिश्रम घेतले होते. दिघा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असून, रुग्णसंख्या एक हजारपर्यंतही पोहोचलेली नाही.
नवी मुंबईमध्ये सुरुवातीला सर्वांत कमी रुग्ण बेलापूर परिसरात होते. परंतु मागील काही दिवसांत बेलापूरची स्थितीही हाताबाहेर जाऊ लागली आहे. ६ आॅगस्टला या परिसरात १९७६ रुग्ण होते. एक महिन्यात तब्बल १५२७ रुग्ण वाढले असून, ६ सप्टेंबरला रुग्णसंख्या ३५०३ वर पोहोचली आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन उपाययोजना राबविण्यात मनपाला अपयश येत आहे. नागरिकांकडूनही पालिकेला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. शहरातील सर्वांत गंभीर स्थिती नेरूळमध्ये झाली आहे. येथे रुग्णसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे. नागरिक नियम पाळत नसल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कापखैरणेतील स्थितीही गंभीर आहे. साडेचार हजारपेक्षा जास्त रुग्ण झाले असून, शंभरपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
तुर्भे पॅटर्न राबविण्यात अपयश : जूनमध्ये तुर्भे परिसरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. येथील नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश मिळविले. तुर्भे पॅटर्नची चर्चा शहरभर झाली व तो इतर विभागांत राबविण्याच्या सूचना झाल्या. परंतु बेलापूर, नेरूळ व कोपरखैरणे परिसरात याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झालेली नाही. रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांशी संपर्क व त्यांची तपासणी करण्यास अपेक्षित गती येत नसल्याने रुग्ण वाढत आहेत.
तपासणीस असहकार्य : बेलापूर व इतर काही परिसरामध्ये आरोग्य विभागाला नागरिकांचेही अपेक्षित सहकार्य मिळत नाही. एखादा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभाग रुग्णाच्या संपर्कातील २०ते २५ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. संपर्कातील व्यक्तीसही चाचणी करण्यास सांगितले जाते. परंतु बेलापूर परिसरात या मोहिमेला अपेक्षित यश येत नाही. संपर्कात येऊनही लक्षणे दिसेपर्यंत अनेक जण तपासणीच करीत नाहीत. पालिकेने अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी लागणारा विलंब कमी करण्यासाठी स्वत:ची लॅब सुरू केली. प्रतिदिन एक हजार चाचण्यांची क्षमता असलेली लॅब सुरू झाल्यामुळे चाचण्यांसाठी होणारा विलंब थांबला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रातील प्रमुख डॉक्टरांची भूमिकाही महत्त्वाची आहे. तुर्भे, दिघा परिसरात नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी परिश्रम घेतल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले. बेलापूर विभागात करावे आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा संपर्क व समन्वय उत्तम आहे. परंतु सीवूड सेक्टर ४८ मधील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या कार्यशैलीविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टरांनीच योग्य समन्वय ठेवला नाही, तर नागरिकांचे त्यांना सहकार्य कसे लाभणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.