नेरुळ-भाऊचा धक्का जलप्रवासाला मे महिन्याचा मुहूर्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:03 AM2020-03-04T00:03:50+5:302020-03-04T00:03:55+5:30

नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे.

Nerul-brother shocked for May trip | नेरुळ-भाऊचा धक्का जलप्रवासाला मे महिन्याचा मुहूर्त?

नेरुळ-भाऊचा धक्का जलप्रवासाला मे महिन्याचा मुहूर्त?

Next

नवी मुंबई : नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. सध्या नेरुळ येथे उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत नेरुळ ते भाऊचा धक्का या दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार मे २०२० पासून या मार्गावर प्रत्यक्ष जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना सिडकोने बनविली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या टप्प्यात वर्षाला २० दशलक्ष प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात ही संख्या वर्षाला ६० दशलक्ष इतकी गृहित धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जलद दळणवळणाची साधने आवश्यक असणार आहेत, त्यानुसार सिडको व राज्य शासन दळणवळणाच्या विविध पर्यायांवर विचार करत आहे. त्यामध्ये न्हावा-शेवा सी लिंक, कोस्टल रोड, सीएसएमटी-पनवेल रेल्वे उन्नत मार्ग आदीचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतून प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलदगतीने पोहोचता यावे, या दृष्टीने जलमार्गाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्यासोबत बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. बीपीटी, जेएनपीटी आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा सागरी मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून वाशी, बेलापूर आणि नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील नेरुळ जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी सुमारे तीन हेक्टर जागेवर जलवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. यात पाइल्ड प्लॅटफॉर्मवर टर्मिनलला जोडणारा रस्ता, टर्मिनलची इमारत, पार्किंग सुविधा, नेव्हिगेशनल आणि मार्शलिंग क्षेत्राचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी सिडकोने १११ कोटी रुपयांची तरतूद केली असून, एप्रिल २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज सिडकोने व्यक्त केला आहे. त्यानंतर मे २०२० पासून नेरुळ ते भाऊचा धक्का दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे सिडकोने आले आहे.
>रस्ते वाहतुकीपेक्षा प्रस्तावित जलमार्ग अधिक सुकर व गतिमान असणार आहे. या जलमार्गामुळे मुंबई व नवी मुंबईतील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. सुरू करण्यात येणाऱ्या कॅटामरान सेवेमुळे नेरुळ ते भाऊचा धक्का हे अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करता येणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हा जलमार्ग अत्यंत उपयुक्त ठरणारा असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
नवी मुंबई ते मुंबई दरम्यान जलमार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोसह बीपीटी, जेएनपेटी व मेरीटाइम बोर्डाच्या संयुक्त प्रयत्नातून नवी मुंबई ते मुंबई दरम्यान, जलमार्ग सुरू करण्याची योजना आहे.
सध्या नेरुळ येथील जेट्टीचे काम प्रगतिपथावर आहे. एप्रिल २०२० पर्यंत जेट्टीचे काम पूर्ण करून मे २०२० पर्यंत प्रत्यक्ष जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Nerul-brother shocked for May trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.