नेरुळ येथील महापालिकेची भाजी मंडई ओस; प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:12 AM2019-06-21T01:12:12+5:302019-06-21T01:12:15+5:30
फेरीवाले पदपथावर; नागरिकांची होतेय गैरसोय
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ सेक्टर १८ येथील भाजी मंडईमध्ये ओटले वाटप झालेले व्यावसायिक मंडईमध्ये व्यवसाय करीत नसून पदपथावरच व्यवसाय करीत आहेत. महापालिकेने लाखो रुपये खर्च केलेल्या मंडईचा वापर साहित्य ठेवण्यासाठी केला जात असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच यामुळे पदपथावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील नागरिकांना मार्केटची सोय व्हावी आणि पदपथावर व्यवसाय करणारे लहान व्यावसायिकांना व्यवसायासाठी आपल्या हक्काची जागा मिळावी यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून मार्केटच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. परंतु या इमारतींमधील ओटल्यांचा वापर होत नसल्याने शहरातील अनेक मंडई ओस पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेरु ळ सेक्टर १८ मधील भूखंड क्र मांक १५ वर २४ ओटल्यांची भाजी मंडई सुरू करण्यात आली होती. या भाजी मंडईतील ओटल्यांचे वाटप देखील करण्यात आले होते, परंतु काही फेरीवाले पदपथावर व्यवसाय करीत असल्याने नागरिक खरेदीसाठी मार्केटमध्ये येत नसल्याचे सांगत मार्केटच्या इमारतीमध्ये ओटले मिळालेले सर्वच फेरीवाले पुन्हा पदपथावर व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे मंडईची इमारत धूळखात पडली असून या मंडईमध्ये जागा मिळालेले व्यावसायिक पदपथावर व्यवसाय करून रात्री साहित्य ठेवण्यासाठी या मंडईमधील जागेचा वापर करीत आहेत. व्यवसायासाठी फेरीवाल्यांनी पदपथ काबीज केल्याने ये-जा करणाºया पादचाऱ्यांना देखील विविध समस्यांचा सामना करावा लागतो.