नवी मुंबई : बहुप्रतीक्षित नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंत लोकल सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. मंगळवारी रेल्वे सुरक्षा विभागाचे आयुक्त ए.के.जैन यांनी या मार्गाची पाहणी करून चाचणी घेतली. ही चाचणी शंभर टक्के यशस्वी झाली झाल्याचा दावा रेल्वेच्या सूत्राने केला आहे. नेरूळ-उरण लोकलसाठी ४ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित केल्याची माहितीसुद्धा या सूत्राने दिली.नेरूळ-उरण लोकलमुळे या पट्ट्यातील विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सिडकोने या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याबाबत विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही दिवसापूर्वी रेल्वेच्या टॉवर व्हॅगनमधून बेलापूर ते खारकोपर स्थानकापर्यंतच्या कामांची पाहणी केली होती. त्यानंतर गेल्या शुक्रवारी रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या पथकाने नेरूळ-खारकोपर-बेलापूर मार्गाची चाचणी घेतली होती. या मार्गावर प्रत्यक्षात बारा डब्यांची लोकल चालवून तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त जैन यांच्या उपस्थितीत पुन्हा चाचणी घेण्यात आली. यावेळी रेल्वेचे रूळ, स्थानकांतील प्रवाशांची सुरक्षा, सिग्नल यंत्रणा आदींचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यानंतर लोकलच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. या सर्व चाचण्या शंभर टक्के यशस्वी झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्राने दिली. या पाहणीदरम्यान, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत सिडकोच्या संबंधित विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. हा अहवाल तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष लोकलच्या शुभारंभाचा मुहूर्त निश्चित केला जाईल, असेही स्पष्ट केले आहे. असे असले तरी उद्घाटनासाठी ४ नोव्हेंबरची वेळ जवळपास निश्चित झाल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. मात्र, रेल्वेकडून अहवाल प्राप्त झाला नाही. अहवाल प्राप्त होताच उद्घाटनाची तारीख निश्चित सांगता येईल, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर १0 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात नेरूळ-सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर या पाच स्थानकांचा समावेश आहे. यातील पाचव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे, तर तिसºया क्रमांकाच्या तरघर स्थानकाचे काम सुरू आहे. हे स्थानक अत्याधुनिक स्वरूपाचे असणार आहे. असे असले तरी सध्या या स्थानकावर लोकल थांबा नसणार आहे.नेरूळ ते खारकोपर या पहिल्या टप्प्यातील अंतर १२ किमी इतके आहे, तर त्यापुढील म्हणजेच खारकोपर ते उरण हे अंतर १५ किमी इतके आहे. एकूण २७ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी सिडको व रेल्वे यांच्याकडून अनुक्रमे ६७: ३३ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे. एकूण १७८२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून या मार्गावर चार उड्डाणपूल, १५ सबवे मार्गिका, रस्ते यांचा समावेश आहे.
नेरूळ-खारकोपर लोकल सेवेला दिवाळीचा मुहूर्त ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:23 AM