लॉकडाऊनमध्ये लाटला नेरुळचा रस्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 02:44 AM2020-11-19T02:44:39+5:302020-11-19T02:45:13+5:30

कोट्यवधी किमतीच्या जागेचा घोटाळा : अतिक्रमण विभागानेही दिला वरिष्ठांना अहवाल

Nerul Road fraud in Lockdown | लॉकडाऊनमध्ये लाटला नेरुळचा रस्ता 

लॉकडाऊनमध्ये लाटला नेरुळचा रस्ता 

Next

सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लॉकडाऊनदरम्यान अतिक्रमण करून रस्ताच बळकावल्याचा प्रकार नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी मिळून एकत्रित हा भूखंड हडपला आहे. 


 या अतिक्रमण संदर्भात नेरुळच्या अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण सर्व्हिस रोडवर झाल्याचा अहवालही वरिष्ठांना सादर केलेला आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तूर्तास रहिवाशी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून त्यांना बेघर करू नये, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याच निर्देशाचा सोयीनुसार अर्थ लावत या रस्त्यावरील वाढीव बांधकामांना पाठबळ देण्याचे काम काही अधिकारी करत असल्याचाही आरोप होत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. नेरुळ सेक्टर १८ ए येथे आगरी कोळी भवनच्या समोरील मार्गावर असलेल्या रो हाउसच्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. तिथल्या रो हाउसधारकांना वाहने वळविण्यासाठी तीन मीटरचा रस्ता (सर्व्हिस रोड) ठेवण्यात आला होता. त्यानुसार, मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या या सर्व्हिस रोडचा वापर आजवर रो हाउसधारकांकडून वाहने पार्किंग करण्यासाठी वापरला जात होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या संधीचा फायदा घेत, तिथल्या पंधराहून अधिक रो हाउसधारकांनी एकत्रितरीत्या संपूर्ण रस्ताच बळकावला आहे. तीन मीटर रुंदीच्या या संपूर्ण रस्त्याचे क्षेत्रफळ दहा गुंठ्याहून अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


सद्यस्थितीला नेरुळमधील जमिनीचे दर गगनाला भिडलेले असून, गुंठ्याला कोटीच्या घरात किंमत आहे. त्यानुसार, बळकावण्यात आलेला रस्त्याचे मूल्य कोट्यवधींच्या घरात असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी बांधकाम सुरू असतानाच, अनेकांनी पालिका अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिली होती, परंतु रस्ता हडपणाऱ्या व्यक्ती प्रतिष्ठित असल्याने, शिवाय त्यांना राजाश्रय असल्याने कारवाईकडे कानाडोळा झाल्याचा आरोप होत आहे. 

कोट्यवधींचा भूखंड
नेरुळ सेक्टर १८ ए मधील तीन मीटरचा रस्ता बळकावण्यात आला आहे. भूखंड क्रमांक ९७ ते १००, १०५, १०६, ११७ ते १२४ या भूखंडांचा समावेश आहे. त्यांनी बळकावलेल्या भूखंडाची किंमत सध्या कोट्यवधींच्या घरात आहे.

त्रयस्थ व्यक्तींना जागा
नेरुळ सेक्टर १८ ए येथे आगरी कोळी भवनच्या समोरील मार्गावर असलेल्या रो हाउसच्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. रस्त्याची जागा रो हाउसधारकांनी स्वतःच्या मालकीची भासवून त्या ठिकाणी खासगी गार्डन, पार्किंग यांची सोय करण्यात आली आहे. तर काहींनी बळकावलेल्या रस्त्याची जागा त्रयस्थ व्यक्तींना व्यवसायासाठी भाड्याने दिल्याची चर्चा आहे. यावर कोणाचा वचक नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Nerul Road fraud in Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.