नामदेव मोरे, नवी मुंबई नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्रवेशद्वारावरच मद्यपींचा अड्डा सुरू आहे. येथील दारू विक्रीच्या दुकानाबाहेर रोज ५०० ते ६०० जण मद्यपान करत असतात. अनेक वेळा महिला प्रवाशांची छेड काढण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. दारू विकणारे व पिणाऱ्यांना पोलीस, रेल्वे व सिडको प्रशासन पाठीशी घालत असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होवू लागला आहे. नवी मुंबईमधील सर्वाधीक गर्दी असणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये नेरूळचाही समावेश होतो. नेरूळ पश्चिमेला माथाडी कामगार व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची वस्ती आहे. येथील जवळपास १ लाख नागरिक रोज रेल्वेने ये -जा करत असतात. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच सिडकोने मद्यविक्री करणाऱ्यांना दुकानाची विक्री केली आहे. जवळपास एक वर्षापासून येथे उघड्यावर मद्यपान सुरू आहे. दारू दुकानदाराने येथे मद्यपान करण्यास मनाई असल्याचा फलक लावला आहे. परंतु तो फक्त औपचारिकता म्हणून. येथे दारू विकणाऱ्यांना सोडा, पाणी पुरविण्यासाठी एकास जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. चकण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळतील याची सोय केली आहे. दारू पिण्यासाठी ग्लास उपलब्ध करून दिले जात आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ११ पाच तासामध्ये तब्बत ५०० ते ६०० जण येथे मद्यपान करत आहेत. गुंड प्रवृत्तीचे काही तरूण रेल्वेतून प्रवासी बाहेर येवू लागले की प्रवेशद्वारावर उभे राहतात व प्रवाशांसमोर दारू पितात. कोणी या तरूणांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मारहाण केली जात आहे. येथील जिन्यांपासून मोकळ्या जागेवरही तळीरामांनी बस्तान मांडलेले चित्र दिसू लागले आहे.नेरूळ स्टेशनच्या पश्चिमेला सायंकाळी ६ ते ११ दरम्यान जवळपास २५ हजार प्रवाशी येत असतात. यामध्ये ८ ते १० हजार महिलांचा समावेश आहे. अनेक टपोरी तरूण दारू पिवून महिलांची छेड काढत आहेत. महिलांकडे पाहून शेरेबाजी करत आहेत. यामुळे अनेक महिलांनी या प्रवेशद्वाराकडून येण्याचे बंद केले आहे. एक वर्षापासून सुरू असलेल्या चा अवैध प्रकाराकडे पोलिस, रेल्वे व सिडको प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
नेरुळ स्टेशनमध्ये मद्यपींसाठी प्रवाशांना धरले वेठीस
By admin | Published: September 14, 2016 4:40 AM