नवी मुंबई : नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंतची लोकल सेवा सुरू करण्याबाबत सिडको आग्रही आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर चाचणी व इतर आवश्यक कामे केली जात आहे. एकूणच रेल्वेच्या संमतीनंतरच या मार्गावर प्रत्यक्ष लोकल धावणार आहे. तूर्तास सिडकोने आपली जबाबदारी पूर्ण केली असून आता या लोकलचा चेंडू रेल्वेच्या कोर्टात ढकलला आहे.नेरूळ-उरण लोकलमुळे या पट्ट्यातील विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सिडकोने या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याबाबत विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पंधरा दिवसापूर्वी रेल्वेच्या टॉवर व्हॅगनमधून बेलापूर ते खारकोपर स्थानकापर्यंतच्या कामांची पाहणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या पथकाने नेरूळ-खारकोपर-बेलापूर मार्गाची चाचणी घेतली. एकूणच पुढील आठवडाभरात या मार्गावरील लोकलचा मुहूर्त गाठला जाईल, अशी शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे.
नेरूळ-उरण लोकलचा चेंडू रेल्वेच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:21 PM