नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याची डेडलाइन पुन्हा हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर लोकल सुरू करण्यासाठी यापूर्वी तीन वेळा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता; परंतु विविध कारणांमुळे हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला होता. आता १५ आॅगस्टची चौथी डेडलाइनसुद्धा हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पहिल्या टप्प्यात नेरुळ ते खारकोपर दरम्यान १५ आॅगस्टपर्यंत प्रत्यक्ष लोकल सुरू करण्याचे सिडकोने जाहीर केले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गेल्या महिन्यात या कामाची पाहणी करून, संबंधित विभागाला तशा सूचनाही केल्या होत्या. सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर दहा स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात नेरुळ-सीवूड, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर या पाच स्थानकांचा समावेश आहे. यातील पाचव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे, तर तिसºया क्रमांकाच्या तरघर स्थानकाचे काम सुरू आहे. सीवूड, बामणडोंगरी आणि खारकोपर स्थानकांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तसेच तरघर स्थानकांच्या कामासाठी जुलै महिन्याची डेडलाइन देण्यात आली होती. करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील ट्रॅकिंग, टॅक्शन आणि टेलिकम्युनिकेशन आदी कामांसाठी ही स्थानके रेल्वेकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे. कारण स्थानके हस्तांतरित झाल्यानंतर त्यावर प्रत्यक्ष लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला किमान महिन्याभराचा कालावधी आवश्यक आहे. सध्या सीवूड, बामणडोंगरी व खारकोपर या स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत; परंतु तरघर स्थानकाचे काम अद्यापि सुरूच आहे. पुढील दोन-तीन दिवसांत ते पूर्ण होईल, याची शक्यता कमीच आहे. त्यामुळेच नेरुळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याच्या लोकलचा १५ आॅगस्टचा मुहूर्तही टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.२७ कि.मी. लांबीचा रेल्वेमार्गसीवूड ते खारकोपर या पहिल्या टप्प्यातील अंतर १२ कि.मी. इतके आहे, तर त्यापुढील म्हणजेच खारकोपर ते उरण हे अंतर १५ कि.मी. इतके आहे.एकूण २७ कि.मी. लांबीचा हा रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी सिडको व रेल्वे यांच्याकडून अनुक्रमे ६७:३३ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे.एकूण १७८२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून, या मार्गावर चार उड्डाणपूल, १५ सबवे मार्गिका, रस्ते यांचा समावेश आहे. यापूर्वी तीनदा रेल्वे मार्गाला मुदतवाढ देण्यात आली आहे.सीवूड, बामणडोंगरी आणि खारकोपर या तीन स्थानकांचे काम पूर्ण करून रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. पुढील तीन-चार दिवसांत तरघर स्थानकही रेल्वेच्या ताब्यात दिले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष लोकल सेवा सुरू करण्यास रेल्वेला २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे १५ आॅगस्टला सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे रेल्वेने कळविले आहे. असे असले तरी आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या मार्गावरील पहिला टप्पा सुरू करण्यात येईल.- डॉ. मोहन निनावे,मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको
नेरुळ-उरण रेल्वेची डेडलाइन पुन्हा हुकणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 3:39 AM