नेरुळ-उरण रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वाकडे; दोन दशकांची प्रतीक्षा संपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:49 AM2018-08-25T01:49:38+5:302018-08-25T01:50:08+5:30
उलवे ते उरण परिसरातील लाखो नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे
- नामदेव मोरे
नवी मुंबई : उलवे ते उरण परिसरातील लाखो नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. नेरुळ ते खारकोपर दरम्यान पहिल्या टप्प्यातील रेल्वे सेवा आॅक्टोबरपर्यंत सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूरहोऊन विकासालाही गती मिळणार आहे.
नवी मुंबईमध्ये १९९२ मध्ये रेल्वे वाहतूक सुरू झाली व येथील विकासाला गती मिळाली. ठाणे- वाशी व ठाणे-पनवेल रेल्वे सुरू झाल्यानंतर कोपरखैरणे ते दिघा परिसरातील बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले. वाशी ते पनवेलपर्यंतचा विकास गतीने होत असला तरी उरण परिसरात अपेक्षित गतीने विकास होत नव्हता. रेल्वे सेवा नसल्यामुळेच त्या परिसरामध्ये बांधकाम व्यवसाय धिम्या गतीने सुरू होता. यामुळे १९९७ मध्येच नेरुळ-उरण रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ४९५ कोटी रुपये होता; परंतु या मार्गामध्ये अनेक अडथळे येत गेले व प्रकल्पाचा खर्च तब्बल १७८२ कोटी रुपयांवर गेला. जमीन संपादनासह वनविभागाच्या अडथळ्यामुळे निर्धारित वेळेमध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. सिडकोने विमानतळाचे काम सुरू केल्यानंतर रेल्वे प्रकल्पाच्या कामांनाही गती दिली. नेरुळ-उरण रेल्वेचे दोन टप्पे करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १२ किलोमीटरचा समावेश करण्यात आला. या मार्गावरील कामे जवळपास पूर्ण होत आली होती; परंतु प्रत्यक्षात कधी रेल्वे सुरू होणार याविषयी ठोस तारीख सांगितली नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी घेतलेल्या मीटिंगमध्ये रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पहिला टप्पा आॅक्टोबरमध्ये सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आॅक्टोबरमध्ये रेल्वे सुरू झाल्यास विकासाला मोठी गती मिळणार आहे. सिडकोने उलवे नोड विकसित केला; परंतु वाहतुकीची सोय नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली होती. जुईनगर, नेरुळ व सीबीडी रेल्वे स्टेशनपासून खासगी टॅक्सी व रिक्षांचा वापर करून उलवे येथे जावे लागत होते. उरण महामार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असल्यामुळे व बसेसची संख्या मर्यादित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. रेल्वे सेवा लवकर सुरू व्हावी, अशी मागणी केली जात होती. अखेर आॅक्टोबरचा मुहूर्त सापडला आहे.
पहिल्या टप्प्यातील रेल्वे स्थानकाची उभारणी सिडको करणार आहे. सागरसंगम वगळता इतर रेल्वे स्थानकाची महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वे प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक कामे केली जात आहेत.
तरघर होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक
उरण मार्गावर तरघर रेल्वेस्थानक विमानतळापासून जवळ असणार आहे. यामुळे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक करण्याचा सिडकोचा मानस आहे. रेल्वे सुरू करण्यासाठीचे काम पूर्ण केले जाणार असून उर्वरित विकासकामे टप्प्या टप्प्याने केली जाणार आहेत.
उलवेवासीयांना दिलासा
सिडकोने उलवे नोड विकसित केला असून त्या परिसरामध्ये हजारो नागरिक वास्तव्यासाठी गेले आहेत. रेल्वे नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना बस, रिक्षा व टॅक्सी, जीपचा आधार घ्यावा लागत आहे. वाहतुकीची सोय नसल्यामुळे अनेकांनी घरे खरेदी करूनही तेथे वास्तव्यास जाणे टाळले आहे. या सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बांधकाम उद्योगालाही गती
उलवे परिसरामध्ये शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू आहे. दोन महिन्यांत रेल्वे सुरू होणार असल्यामुळे या परिसरातील बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे. घरांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. या परिसरामधील गुंतवणूक वाढणार आहे.
पहिला टप्पा
रेल्वे मार्गाची लांबी : १२ किलोमीटर
मार्गाचे स्वरूप : सीवूड ते खारकोपर व बेलापूर ते सागरसंगम
सीवूड : पहिल्या टप्प्याची सुरुवात सीवूड रेल्वेस्थानकापासून होणार आहे. येथील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन २०१६ मध्येच त्याचा वापर सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण केले जाईल.
तारघर : सिडकोने रेल्वेस्थानकाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, स्थानक इमारतीच्या एकात्मिक विकासाची कामे प्रगतिपथावर असून १८६ मीटर लांबीचे संपूर्ण आरसीसी छताचे काम पूर्ण झाले आहे.
बामणडोंगरी : सिडकोने प्लॅटफॉर्म व आवश्यक कामे पूर्ण करून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतर केले आहे. फर्निचर व इतर कामे प्रगतिपथावर आहेत.
खारकोपर स्थानक : स्थानकाची अत्यावश्यक कामे पूर्ण करून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतर करण्यात आली आहेत. बेंचेस, अत्यावश्यक फर्निचरची कामे सुरू आहेत.
दुसरा टप्पा
रेल्वे मार्गाची लांबी :
१५ किलोमीटर
मार्गाचे ठिकाण : खारकोपर, गव्हाण, रांजनपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी-उरण
मध्य रेल्वेने दुसºया टप्प्यामधील चार स्थानकांचे काम सुरू केले आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत दुसºया टप्प्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दुसºया टप्प्यातील प्रमुख आगारकाम, पूल, भुयारी मार्गांचे काम पूर्ण होत आले आहे.
दुसºया टप्प्यामध्ये १३.९३ हेक्टर जमीन संपादित केली असून, उर्वरित जमीन संपादनाचे काम सुरू आहे.
या मार्गावर चार हेक्टर जमीन वनविभागाची असून त्यासाठीची मंजुरी आली आहे.
उरण मार्गावरील रेल्वेस्थानक : सीवूड, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजनपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी आणि उरण
वैशिष्ट्ये : रोडवर चार महत्त्वाचे पूल, ७८ छोटे पूल, १५ भुयारी मार्ग, प्रवाशांसाठी सर्व सुविधा असलेली रेल्वेस्थानक