नवी मुंबई : नेरुळ येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात कामगाराची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार अवघ्या २४ तासांच्या आत नेरुळ पोलिसांनी मारेकºयाला भोईसरहून अटक केली.नेरुळ सेक्टर ११ येथील भाजपा कार्यालयाच्या इमारतीमध्ये तिसºया मजल्यावर हा प्रकार घडला आहे. तिथल्या आदिल डेव्हल्पर्सच्या कार्यालयातील कामगार गुड्डू सुवर्ण याची छातीत गोळी झाडून हत्या करण्यात आलेली होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुड्डू हा त्याठिकाणी अमर यादव व गौरव सिंग या दोन मित्रांसोबत कार्यालयात होता. तिघेही आदिल डेव्हल्पर्सच्या कार्यालयातील कामगार आहेत. त्याठिकाणी गौरव व गुड्डूमध्ये किरकोळ वाद झाला असता, गौरव याने स्वत:कडील गावठी कट्ट्यातून गुड्डूवर गोळी झाडली. ही गोळी छातीत लागल्याने तो कोसळला असता गौरवने त्याठिकाणावरून पळ काढला. या वेळी तिथे उपस्थित अमर यादव याने काही मित्रांना कळवून जखमी गुड्डूला रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी गौरव सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्या शोधासाठी वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी पोलीस निरीक्षक भागुजी औटी, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, सचिन शेवाळे यांचे पथक तयार केले होते. त्यांनी गौरवच्या पूर्व ठिकाणांची माहिती काढून भोईसर येथे सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नेरूळमध्ये कामगाराची हत्या, २४ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 5:11 AM